शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकासआघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाला होता.
काँग्रेस नेते विशाल पाटील या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला द्यायला विरोध केला होता. उद्धव ठाकरेंच्या या प्रचारसभेत विश्वजीत कदम व्यासपीठावर उपस्थित होते.
'विश्वजीत कदम हे माझे उत्तम सहकारी आहेत. आघाडी करतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला त्याच्या मतानुसार कशा जागा मिळतील? सांगलीची जागा काँग्रेसकडून गेली हे मान्य आहे. पक्षाचा नेता म्हणून मिरवणं सोपं आहे, पण कार्यकर्त्यांना जपणं अवघड आहे. रामटेक, कोल्हापूर, अमरावती या जिंकणाऱ्या जागा आम्ही सोडल्या. भाजपने आमचा विश्वासघात केला नसता, तर आम्ही भाजपसोबत राहिलो नसतो,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'सांगली विश्वजीतला देत आहेत, हे समजलं असतं तर मी सांगली सोडली असती. आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. शिवसेना उद्या कुणाच्या आड येणार नाही. तुमच्याकडून हिसकावून घेतलेली जागा हिसकावून घेण्यासाठीच आलोय', असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.'या देशावर कोण राज्य करणार हे तुम्ही ठरवता. या क्षणाला मोदींचं भविष्य तुमच्या हातात आहे. पूर आला, कोणतंही संकट आलं की मोदी आले का? आज महाराष्ट्रभर फिरत आहेत. आज पंतप्रधान मोदी माझं कौतुक करत आहेत. पहिल्यांदा शिवसैनिकांचं कौतुक करा. रात्रीचं कारस्थान करून माझं सरकार पाडलं आणि आज माझं कौतुक करता. एका बाजूला नकली शिवसेना म्हणता, दुसऱ्या बाजूला कौतुक करता', असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.