Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटलांवरील निलंबणाची कारवाई टाळली :, शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका!

विशाल पाटलांवरील निलंबणाची कारवाई टाळली :, शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका!


सांगली : सांगली लोकसभा  मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील  यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशाल यांच्यावर कारवाईसाठी शिवेसना  ठाकरे पक्षाने दबाव आणला होता, मात्र त्यापुढे न झुकण्याची भूमिका काँग्रेसने  घेतली आहे.


माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील  यांचे काँग्रेससाठीचे योगदान, विशाल यांच्या बंडामागची भूमिका, भविष्यातील सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे गणित आणि विशाल यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची अपेक्षा, ही त्याची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हेही कारवाईबाबत फारसे आग्रही नसल्याचे चित्र समोर आले आहे. आता निवडणूक संपल्याने तो विषयही गुंडाळला आहे.

विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये, यासाठी प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न केले जात होते. 'सांगलीत बंडखोरी झाल्यास त्याचे राज्यभर पडसाद उमटतील,' असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिला होता. त्यामुळे काँग्रेस सावध होती. विशाल यांना राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यत्वाची ऑफरदेखील आमदार विश्‍वजित कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली होती.

विश्‍वजित यांच्या माहितीनुसार, थेट खासदार राहुल गांधी यांनी तसा शब्द दिला होता; परंतु विशाल यांनी, 'हे बंड काँग्रेसचेच आहे,' असे सांगत उमेदवारी कायम ठेवली. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असे संकेत मिळत होते. कोल्हापूर येथील बंडखोर बाजीराव खाडे यांचे निलंबन करण्यात आले. ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय असताना त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे विशाल यांच्यावरही कारवाईची शक्यता वर्तवली गेली होती.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगली दौऱ्यात याबाबत वाच्यता केली. 'सांगलीतील स्थितीचा अहवाल राष्ट्रीय समितीकडे पाठवेन, तेथून आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल,' असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी विशाल यांच्यावर कारवाईसाठीचा नव्हे, तर सांगलीतील परिस्थितीचा अहवाल पाठवण्याचे सूतोवाच करून त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली होती. तसेच घडले. विशाल यांच्यावर कारवाई टाळण्यात आली.

विश्‍वजित यांचा कारवाईला विरोध

विशाल पाटील यांच्यावरील कारवाईला आमदार विश्‍वजित कदम यांनी विरोध केल्याचे समजते. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आधीच प्रचंड नाराज व आक्रमक होते. विशाल यांनी हे काँग्रेसचे बंड असल्याचे जाहीर केले. तेव्हा, कारवाई करून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना अधिक दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.