इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले सॅम पित्रोदा यांनी भारतातील लोकांच्या दिसण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वधेरा यांचे पती रॉबर्ट वधेरा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सॅम पित्रोदा यांचे विधान एकदम बकवास असून एका उच्च विद्याविभूषित व्यक्तीकडून अशाप्रकारचे विधान कसे केले जाऊ शकते, असा सवाल त्यांनी केला आहे.
रॉबर्ट वधेरा म्हणाले की, सॅम पित्रोदा हे दिवंगत राजीव गांधी यांच्या खूप जवळचे होते. तुम्ही गांधी परिवारासोबत जोडले गेले आहात तर तुमच्याकडे एक मोठी शक्ती आणि जबाबदारी आलेली आहे. या जबाबदारीचे भान ठेवून कुठल्याही गोष्टीवर बोलण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी भाजपचा पराभव करण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत. पित्रोदा यांच्या एका विधानामुळे भाजपला अनावश्यक मुद्दा मिळाला आहे.'
'राजकारणात मला कोणाला उत्तर देण्यासाठी नव्हे तर देशाची सेवा करायला यायचे आहे. राज्यसभेच्या माध्यमातून देशभरातील जनतेचे काम करण्याची माझी इच्छा आहे. मी अमेठी, रायबरेली, मुरादाबादमध्ये कायम जात राहीन, कारण तेथील जनतेचा आशीर्वाद मला हवा आहे. त्यासाठीच काही काळानंतर राजकारणात सक्रीय होणार आहे,' असा खुलासा वधेरा यांनी केला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात काही मतभेद आहेत काय? अशी विचारणा केल्यावर वधेरा यांनी दोघांमध्ये कुठलेही मतभेद नसून देशासाठी काही चांगले करण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.