भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेची डिलीव्हरी झाल्यानंतर तिच्या पोटात कापड राहिल्याची घटना नुकतीच उघड झाली. रुग्णालयातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली. हे प्रकरण ताजे असतानाच आता उल्हासनगरमधील रुग्णालयातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईक हे अंडरवेअरमधून चक्क दारूच्या बाटल्या आणत असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर गांजा, गुटखा देखील सापडले. उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील मध्यवर्ती रुग्णालयातील या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बनसोडे यांनी ही माहिती दिली असून त्याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय झालं ?
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. येथे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची परिस्थिती सध्या मध्यवर्ती रुग्णालयात दिसत आहे. रुग्णालयाच्या भिंती व स्वच्छतागृह गुटक्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची रुग्णालय प्रवेशद्वारवर अंगझडती घेण्याचे आदेश दिले.
अंगझडतीत काय सापडलं ?
त्यांच्या आदेशानुसार, रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांची कसून झ़डती घेण्यास सुरूवात केली. या झडतीत रुग्णांच्या नातेवाईकडे दारू, गांजा, गुटका, तंबाखू आदी पदार्थ सापडत असल्याचे उघड झाले. काही रुग्णाच्या नातेवाईकांनी तर अंडरवेअरमध्ये दारूच्या बाटल्या लपवून आणल्या, त्या बाटल्या रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याने, एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र याला काही रुग्णांचे नातेवाईक छेद देत असल्याचे डॉ मनोहर बनसोडे म्हणाले. रविवारी रात्री असाच प्रकार उघड झाला असून रुग्णांच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून ठेवण्यात आलेल्या दारूच्या बॉटल सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. यापुढे रुग्णांच्या नातेवाईकसह संबंधितांवर कारवाईचे संकेत रुग्णालय प्रशासन यांनी दिले आहे. थेट रुग्णालयात नशेली प्रदार्थाची विक्री रुग्णांना होत असल्याने, मध्यवर्ती रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.