सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची रविवारी (ता. ५) मिरजेतील किसान चौकात सकाळी दहा वाजता सभा आहे. त्यानिमित्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. याबाबतचे ट्विट वंचित आघाडीच्या 'एक्स' हॅंडलवरून करण्यात आले. वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. आता ॲड. आंबेडकर यांची सभा होत आहे.
या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. नागरिकांसाठी आसन व्यवस्था केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी महापौर किशोर जामदार, माजी नगरसेवक सुरेश आवटी, संजय मेंढे, शैलजा पाटील, वहिदा नाईकवडी, अशोक कांबळे, वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायकवाड, संघटक नितीन सोनवणे, संपर्कप्रमुख नजीर झारी, युवा प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हा महासचिव राजू मुलाणी, जिल्हा सदस्य अपर्णा वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गवई आज सांगलीत
रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) नेते डॉ. राजेंद्र गवई आज (ता. ४) सांगलीत येत आहेत. सकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विशाल पाटील यांच्या प्रचार फेरीत ते सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.