विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी (10 मे) रात्री उशिरा हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी 'शहीद हेमंत करकरे यांच्या शरिरात घुसलेली गोळी ही कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती,' असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते.
यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती. लोकप्रतिनिधी कायदा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांनी 'हेमंत करकरे यांची हत्या कसाब किंवा अन्य अतिरेक्यांच्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदुकीच्या गोळीने झाली', असे वक्तव्य केले होते. वडेट्टीवार यांनी उज्वल निकम यांना देशद्रोही असं सुद्धा म्हटलं होतं. हे दोन्ही वक्तव्य आचारसंहिता उल्लंघन आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप वडेट्टीवार यांच्यावर करण्यात आलेला होता.
भाजपकडून देखील निवडणूक आयोगात तक्रार दाखल
वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचा भाजपने निषेध केला होता. त्यांच्याकडून निवडणूक आयोगात देखील या वक्तव्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. तसेच वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपा विधी आघाडी नागपूरतर्फे तक्रार करण्यात आली होती. विधी आघाडी नागपूर महानगरचे अध्यक्ष ॲड. परीक्षेत मोहिते यांनी याबाबत सीताबर्डी पोलिसांत ही तक्रार नोंदवली होती.त्यासोबतच बुधवारी (8 मे) निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तसेच आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडनेही वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. या सर्वाची दखल घेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांनी वडेट्टीवार यांच्याविरोधात सीताबर्डी पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.