गांजा विकणारा भाजपचा माजी पदाधिकारी मुलीसह अटकेत
मीरा रोड : गांजा विक्री प्रकरणात मीरा-भाईंदर भाजपचा माजी पदाधिकारी निहाल एजाज खान (३६, रा. मुन्शी कंपाउंड, काशिमीरा) याला व त्याच्या सावत्र मुलीला अटक करण्यात आली. या दोघांना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, तो गाडीतून फिरत गांजा विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मीरा रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी शिवार उद्यान येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेच्या मार्गावर ३ मे च्या रात्री सातच्या सुमारास निहाल हा एका गाडीच्या आडोशाला संशयास्पदरीत्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचा पोलिसांना दिसून आला. देवकर यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याच्या गाडीत बसलेली तरुणी पळून गेली. पोलिसांनी झडती घेतली असता प्लास्टिक पिशव्यांमध्ये विक्रीसाठी भरलेला ८०० ग्रॅम गांजा, तर दुसऱ्या पिशवीत ७६५ ग्रॅम गांजा आढळला.
शिवाय दोन मोबाइल, वजन काटा, ४ हजार ३०० रोख, प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल आढळला. तपासादरम्यान गाडीतून पळालेल्या सपना ऊर्फ शायदा सियासत खान (२६) हिला देखील अटक केली. निहाल हा भाजपचा माजी युवा जिल्हा सचिव असून, सपना ही त्याची सावत्र मुलगी आहे. तिच्यावर याआधीही अमलीपदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष सांगवीकर करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.