Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरांनी नवजात अर्भकाला उन्हात ठेवण्याचा दिला सल्ला, नातेवाईकांनी अर्धा तास उन्हात ठेवले, बाळाचा झाला मृत्यू

डॉक्टरांनी नवजात अर्भकाला उन्हात ठेवण्याचा दिला सल्ला, नातेवाईकांनी अर्धा तास उन्हात ठेवले, बाळाचा झाला मृत्यू 


नवजात अर्भकाला ऊन दाखवण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला बाळाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांच्या मुलीला उन्हात ठेवल्याने तिचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण मुलीला उन्हात ठेवल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर वाद वाढल्याने संबंधित डॉक्टर हा रुग्णालय सोडून पसार झाला आहे. तर सीएमओंच्या आदेशानुसार या रुग्णालयाला बंद करण्यात आलं आहे, ही घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथे घडली आहे.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मैनपुरीमधील घिरोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील रहिवास असलेल्या विमलेश कुमार यांची पत्नी रीता हिने शहरातील साई रुग्णालयामध्ये पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या प्रकृतीबाबत काही समस्या असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला अर्धातास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला होता.


कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी साडे अकरा वाजता बाळाला रुग्णालयाच्या छतावर उन दाखवण्यासाठी ठेवलं. मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्याने काही वेळातच मुलीचा प्रकृती बिघडली. १२ वाजता नातेवाईकांनी तिला खाली आणलं. मात्र तिथे काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉक्टर रुग्णालय सोडून पसार झाला. दरम्यान, मृत मुलीच्या आईलाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून मैनपुरीचे सीएमओ डॉ. आर.सी. गुप्ता यानी पथक पाठवून रुग्णालय सील केलं आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

दरम्यान, ही घटना परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आरोग्य विभागाकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. आता अधिक तपासानंतरच या नवजात अर्भकाचा मृत्यू नेमका कसा झाला, याची माहिती समोर येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.