Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'डॉ. तावरे तर रजेवर होता पण त्याला फोन गेला'......मंत्री हसन मुश्रीफांचा गोप्यास्फोट

'डॉ. तावरे तर रजेवर होता पण त्याला फोन गेला'......मंत्री हसन मुश्रीफांचा गोप्यास्फोट 


पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी दररोज नवनवे आणि अत्यंत धक्कादायक खुलासे होत आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताची चाचणी न करता 3 लाख रुपयांच्या मोबदल्यात भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचा रिपोर्ट देणारा डॉ. अजय तावरे याने हा सगळा प्रकार ड्यूटीवर नसताना केल्याचं उघड झालं आहे.

हा संपूर्ण बेकायदेशीर प्रकार डॉ. तावरेने रजेवर असताना केला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. डॉ. तावरे हा प्रदीर्घ रजेवर होता. पण या अपघात प्रकरणानंतर त्याला फोन गेला आणि डॉ. हरनोळच्या मदतीने 3 लाख रुपयांमध्ये हा सौदा केला. असं मुश्रीफ हे पत्रकार परिषदेत म्हणाले.


मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट, पाहा नेमकं काय म्हणाले

'आमदार सुनील टिंगरे आहेत त्यांनी पत्र दिलं होतं त्यावर मी शेरा मारला होता त्याप्रमाणे अजय तावरे यांची नियुक्ती करण्यात आलेली. अधिक्षकपदी.. ही नियुक्ती केली कधी.. 26 डिसेंबर 2023 साली.. पण त्यानंतर ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू झाला. ही जेव्हा घटना समोर आली तेव्हा आपण एक समिती नियुक्त केली त्यामध्ये अधिक्षक अजय तावरे हे दोषी आहेत हे कळल्यावर आम्ही त्यांना तात्काळ 10 एप्रिल 2024 ला पदमुक्त केलं.'
'आज ते अधिक्षक पदावर नाहीत. आज ते प्रोफेसर म्हणून कार्य करत आहेत ससूनमध्ये.. ही जी घटना घडली तेव्हा ते रजेवर होते.. प्रदीर्घ रजेवर होते.. त्यानंतर त्यांनी डॉ. हरनोळ जे आहेत ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलचा त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काही तरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालं..'

'आता मला सांगा हा अजय तावरे त्या पदावरच नाही.. पदनियुक्ती दिली होती. सुनील टिंगरेच्या पत्रानुसार हे खरं आहे. पण उंदरांच्या प्रकरणात त्यांना पदमुक्त केलेलं.. ते रजेवर होते, त्यांनी रजेवर असताना केलेला हा प्रताप आहे.'

'हे अतिशय चुकीचं आहे.. न्यायालयं रक्ताचे रिपोर्ट्स आणि त्यावर विश्वास ठेवून न्याय देत असतं. पण अशा घटना घडल्या तर चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे ही अक्षम्य चूक आहे. त्यामुळे त्यांना अद्दल घडवणारी कारवाई आम्ही त्यांच्यावर करू..'

'तावरे हा काही पदावर नाही.. त्याला त्या पदावरून आम्ही काढलंय उंदीर प्रकरणात. तो रजेवर होता.. त्याला बाहेरून फोन गेला मग त्या हरनोळला फोन करून 3 लाख रुपयांच्या मोबदल्यात तो सौदा झाला. अशी गोष्ट आहे ती..' अशी माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या प्रकरणावरून राज्य सरकारवर बरीच टीका केली जात आहे. ज्यानंतर सरकार हे अॅक्शनमध्ये आलं असून आता संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई सुरू केली आहे. मुळात हे प्रकरण धनाढ्या बिल्डरच्या मुलाशी संबंधित असल्याने ते प्रकरण दडपण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला गेल्याचं आता समोर येत आहे. यामुळे संपूर्ण शासकीय व्यवस्थेची लक्तरं ही वेशीवर टांगली गेली आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.