तेलंगणातील भाविकांना कळंबीजवळ लुटणाऱ्या तिघांना अटक मिरज शहर, ग्रामीण पोलिसांसह एलसीबीची कारवाई : उपअधीक्षक गिल्डा
सांगली : कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तेलंगणा येथील भाविकांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती मिरज शहरचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिली.
तरबेज उर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे (वय २६, रा. सिद्धेवाडी, ता. मिरज), रणजित अशोक भोसले (वय २५, रा. वड्डी, ता. मिरज), सुरेश रवि भोसले (वय २०, रा. टाकळी-बोलवाड, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारा तेलंगणा येथील कुकटपल्ली (ता. रंगारेड्डी) येथील चंद्रकांत बावीकाडी कुटुंबासमवेत कोल्हापूरकडे निघाले होते. कळंबी येथील एक्सप्रेस वेवरील एका बंद पडलेल्या पेट्रोल पंपावर ते विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावेळी सात ते आठजणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड, दागिने लंपास केले होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक गिल्डा तसेच एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथके तयार केली होती. खबऱ्याद्वारे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे ही चोरी संशयितांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मिरज ग्रामीण पोलिस तसेच एलसीबी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, रणजित तिप्पे, उपनिरीक्षक कुमार पाटील, संजय कांबळे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अमर नरळे, संदीप नलवडे, उदयसिंह माळी, शशिकांत जाधव, सचिन मोरे, वैभव पाटील, दीपक परीट, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.