पुरोहितांचा जबाब, हिंदू दहशतवादाचे पिल्लू याचा एकत्रित विचार केला तर हे मोठे राजकीय षडयंत्र होते. हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर सर्वात आधी कोणी केला याचा गौप्यस्फोट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केलेला आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला. ठीक एक महिना आधी, म्हणजे ऑगस्ट महिन्यात शरद पवारांनी देशात फक्त मुस्लीम दहशतवाद नसून हिंदू दहशतवाद अस्तित्वात असल्याचा दावा अलिबागमध्ये पक्षाच्या मेळाव्यात केला होता. पवारांच्या या वक्तव्यानंतर मालेगावात बॉम्बस्फोट व्हावा आणि हिंदू संघटनांशी संबंधित व्यक्तिंना त्यात गोवण्यात यावे हा निश्चितपणे योगायोग नाही.
विशेष एनआयए न्यायालयात पुरोहित यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आरडीएक्स, स्फोटकांचे खोटे पुरावे उभे करण्यात आले. साक्षीदारांना गन पॉईंटवर धमकवण्यात आले. चौकशी दरम्यान पोलिसांनी अनन्वित अत्याचार केले. दोन जणांची हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमात दोन वरीष्ठ पोलिस अधिकारी सामील होते, असा खळबळजनक जबाब पुरोहीत यांनी दिलेला आहे. हिंदू दहशतवाद शब्दाची निर्मिती करण्याची गरज यूपीएच्या नेत्यांना का वाटली? या शब्दाची व्युत्पत्ती समजून घेणे फार कठीण नाही. २००० च्या पहिल्या दशकात देशभरात दहशतवादी हल्ल्याचा सुळसुळाट झाला होता. संसदेवर हल्ला झाला. बस, रेल्वे, बाजारपेठा, नद्यांचे घाट, रेस्तराँ असे ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत होते. प्रत्येक घातपातामागे मुस्लीम दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड होत होते.
प्रत्येक मुस्लीम दहशतवादी नसतो, परंतु प्रत्येक दहशतवादी मात्र मुस्लीम असतो, अशा आशयाचे मेसेज विपूल प्रमाणात फिरत होते. आपल्या मतपेढीची अशा प्रकारे बदनामी यूपीएच्या नेत्यांना मंजूर नव्हती. देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्यकांचा ही थिअरी प्रमाण मानणारे हे सरकार होते. ज्याच्या मतावर सरकार बनवायचे, त्यांची प्रतिमा सावरण्याची जबाबदारीपण आपल्या खांद्यावर आहे, याच मानसिकतेतून बहुधा हिंदू दहशतवाद या शब्दाचा उगम झाला. याचे पितृत्व शरद पवारांकडे जाते असा खुलासा ले.कर्नल पुरोहीत यांनी केला आहे.शरद पवारांनी असत्याचा वापर करून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर पवारांनी हेच केले होते. १९९३ चे बॉम्बस्फोट फक्त हिंदूबहुल क्षेत्रात झाले नाहीत, तर कनार्क बंदरसारख्या मुस्लीम एरीयामध्येही झाले हे दाखवण्यासाठी शरद पवारांनी न झालेल्या १३ व्या बॉम्बस्फोटाची पुडी सोडली होती. २००८ मध्ये पवारांनी त्याची पुनरावृत्ती केली. अलिबागमध्ये पक्षाच्या मेळाव्यात देशात फक्त मुस्लीम दहशतवाद नसून हिंदू दहशतवाद सुद्धा अस्तित्वात आहे, असे विधान केले. पवारांच्या या विधानानंतर मालेगावात बॉम्बस्फोट झाला. त्यांनी मांडलेली थिअरी सत्य ठरवण्यासाठी मालेगाव बॉम्बस्फोट करण्यात आला होता का? हिंदू संघटनांना यात गोवण्याचे षडयंत्र होते, हेच सांगण्याचा प्रयत्न पुरोहितांनी या जबाबाच्या माध्यमातून केलेला आहे.साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची चौकशी करताना त्यांचा अमानुष छळ झाला. त्यांना पॉर्न व्हीडीयो दाखवण्यापासून त्यांच्या समोर मुतण्यापर्यंत सर्वप्रकारे त्यांना अपमानित करण्यात आले. जनावरासारखी मारहाण करण्यात आली. एका महिलेला जर अशी थर्ड डीग्री लावली गेली तर विचार करा पुरोहितांची अवस्था काय करण्यात आली असेल ? पुरोहितांना अटक करण्याचे टायमिंगही संशयास्पद वाटते. मिलिटरी इंटेलिजन्ससाठी काम करताना ते एका महत्वाच्या मोहिमेवर होते. खूप मोठ्या अभद्र युतीचा ते पर्दाफाश करत होते. आयएसआय, माफिया दाऊद इब्राहीम आणि भारतातील नक्षलवादी मोठ्या घातपाताच्या मालिकेची तयारी करत होते. पुरोहितांनी दाऊद आणि माओवादी डॉ.गणपती यांच्या गाठीभेटीबाबत अत्यंत संवेदनशील अहवाल २००७ मध्ये केंद्र सरकारला दिला होता.काँग्रेसशी अत्यंत जवळीक असलेल्या झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून घातपातासाठी आयएसआय मार्फत फंडीग केले जात होते. हा अहवाल सुद्धा त्यांनी दिला होता. २००८ मालेगाव बॉम्बस्फोटाचा ठपका ठेवून त्यांना अटक झाली. हा झाकीर नाईक यूपीएचा जावई होता. अत्यंत कट्टरतावादी असलेल्या या भामट्याची व्याख्याने त्या काळी सुरक्षा यंत्रणांसाठी आयोजित करण्यात येत असत. काँग्रेस नेता दिग्विजय सिंह आणि झाकीर नाईकची मोठी जवळीक होती. याच दिग्विजय सिंहने निवृत्त पोलिस अधिकारी एस.एम.मुश्रीफ लिखित 'हू किल्ड करकरे' या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. या पुस्तकात हिंदू दहशतवादाची थिअरी मांडण्यात आली होती जी शरद पवार, दिग्विजय सिंह, पी.चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे यांची चौकडी मांडत होती.खंडाळ्यातील एका बंगल्यात अटकेपूर्वी पुरोहितांचे इंटरॉगेशन सुरू होते. हिंदू संघटनातील सर्वोच्च नेत्यांची नावे पुरोहितांनी घ्यावीत म्हणून त्यांना प्रचंड मारहाण करण्यात येत होती. अर्धमेल्या अवस्थेत एक दिवस त्यांना तिथून निघून जायला सांगितले. परंतु एटीएसच्या एका अधिकाऱ्याने त्यांना तसे न करण्यास बजावले. बाहेर पडल्यावर तुमची हत्या करण्याचा कट आहे, असे त्या अधिकाऱ्याने पुरोहितांना सांगितले. त्याचे ऐकल्यामुळे पुरोहित बचावले.या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन तपास यंत्रणांनी रामचंद्र कालसिंगरा, संदीप डांगे यांची हत्या केल्याचा दावाही पुरोहित यांनी केलेला आहे.
एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे आणि परमबीर सिंह यांना पुरोहित यांनी त्यांच्या अमानुष छळासाठी जबाबदार ठरवले आहे. संघ परिवारातील बड्या नेत्यांची नावे पुरोहित यांच्या तोंडून वदवून घेण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.पुरोहितांचा जबाब, यूपीएच्या काळात सोडण्यात आलेले हिंदू दहशतवादाचे पिल्लू याचा एकत्रितपणे विचार केला तर हे एक खूप मोठे राजकीय षडयंत्र होते, हे स्पष्ट होते. केंद्रात सत्तेवर असलेल्या लोकांच्या दबावामुळेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा या दबावासमोर झुकले असते तर योगी आदित्यनाथ, विश्व हिंदू परीषदेचे नेते, संघाचे नेतृत्व यांना अटक करायला यूपीए सरकारला मोकळी वाट मिळाली असती. शरद पवारांची या षडयंत्रात महत्वपूर्ण भूमिका होती. एक असे षडयंत्र जे देशहिताला ग्रहण लावणारे होते, सेनादलाच्या मानसिकतेवर विपरीत परीणाम करणारे होते, हिंदूंचे खच्चीकरण करणारे होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.