Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मॉलमधून तुम्ही विष तर विकत घेत नाही नां? प्रत्येक पदार्थावर 'हे ' चेक केलंच पाहिजे!

मॉलमधून तुम्ही विष तर विकत घेत नाही नां? प्रत्येक पदार्थावर 'हे ' चेक केलंच पाहिजे!
मुंबई: घरचं अन्न शरीरासाठी नेहमीच चांगलं. कारण पाकिटातून विकत घेतलेले पदार्थ, त्यात मिसळलेले घटक हे शरीरासाठी कधीच चांगले नसतात. गेल्या काही दिवसांपूर्वी बोर्नव्हिटा आणि नेस्ले यांसारखे काही ब्रँड मानकांची मर्यादा कायम न राखू शकल्याच्या बातम्या आल्या होत्या.

त्यात साखरेचं प्रमाण खूप आढळलं होतं. तेव्हापासून पॅक फूडच्या पाकिटांवरची लेबल्स आवर्जून पाहिली जाऊ लागली. प्रत्येक ग्राहकानं हे लेबल अवश्य वाचावं आणि ते समजून घ्यावं. त्यात नमूद केलेले कोणते घटक आपल्या शरीरासाठी कशाप्रकारे हानिकारक आहेत, ते किती प्रमाणात शरीरात गेले पाहिजेत किंवा त्याचं प्रमाण जास्त झालं तर काय त्रास होऊ शकतो, हे आपण समजून घ्यायला हवं. पदार्थ तयार करण्याची तारीख (मॅन्युफॅक्चरिंग डेट) आणि वापरण्याची शेवटची तारीख (एक्सपायरी डेट) इतकंच आपण बघतो.


यापुढे हेसुद्धा आवर्जून पाहा

FSSAI लोगो आणि परवाना क्रमांक - या दोन गोष्टी अशाच उत्पादनांवर आढळतील, ज्या कंपन्या FSSAI रजिस्टर्ड असतात. बाजारात अनेक उत्पादनांमध्ये कोणतीच माहिती सविस्तर दिलेली नसते. 

अॅलर्जी निर्माण करणारे घटक - दूध, सुका मेवा, अंड, मासे, सोयाबीन आणि गहू. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची फूड अॅलर्जी असेल तर पॅक्ड किंवा अनपॅक्ड अशा कोणत्याही प्रकारचं बाहेरचं अन्न त्यांनी खाऊ नये. पॅकिंगवरचं लेबल अवश्य वाचावं. अन्यथा या घटकांच्या थोडाशा अंशामुळेही शरीरावर खाज, रॅश, ताप, सर्दी, शिंका, नाक गळणं, अतिसार असे त्रास होऊ शकतात.

पोषणतत्त्वांची माहिती - पॅक्ड पदार्थांच्या पाकिटावर मागच्या बाजूला याचा उल्लेख आढळेल. यात कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, ट्रान्स फॅट, डाएटरी फायबर्स यांची माहिती असते.

घटक - पाकिटाच्या मागच्या बाजूला असलेल्या पोषणतत्त्वांच्या माहिती शेजारीच समाविष्ट घटकांची माहिती असते. साखर, प्रोटीन याची माहिती आपल्याला असते. कॉर्न सिरप, अॅसिडिटी रेग्युलेटर आदी गोष्टी आपल्याला समजत नाहीत. यादीतले जे घटक माहिती नसतील त्याची इंटरनेटवरून माहिती घेऊ शकता.

प्रिझर्व्हेटिव्ह - कोणताही पदार्थ दीर्घ काळ टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरली जातात. यात काही रयासनं मिसळली जातात. याचा फायदा ग्राहकांसाठी नसून तो कंपन्यांनाच होत असतो. सल्फर डायऑक्साइड, बेंझोइक अॅसिड, प्रोपिऑनिक अॅसिड अशी प्रिझर्व्हेटिव्ह वापरली जातात.

कॅलरी - विकतचा पदार्थ खाल्ल्यानंतर किती कॅलरीज शरीराला मिळतात, याची माहिती असते. एखाद्या पाकिटावर फॅट फ्री लिहिलं असेल तर तो पदार्थ कॅलरी फ्री आहे, असा अर्थ होत नाही. प्रत्येक पदार्थात साखरेच्या प्रमाणानुसार स्वतंत्र कॅलरीज असतात. तेल, रिफाइंड, अॅडेड शुगर यामुळे मिळणाऱ्या कॅलरीज शरीरासाठी त्रासदायक असतात. ज्यात फॅटचं प्रमाण अधिक असतं, त्यात साखरही जास्त असते. मिठाई, भटुरे, पराठे असे पदार्थ टाळावेत.

पाकिटाच्या वजनानुसार त्याचा सर्व्हिंग साइज ठरतो. बिस्किटाचं पाकीट 50 ग्रॅमचं असेल तर त्यावर सर्व्हिंग साइज 15 ग्रॅम (4 बिस्किटं) लिहिलेला असतो. याचा अर्थ पूर्ण पाकिटातून एखाद्यानं फक्त 4 बिस्किटं खाल्ली पाहिजेत. आपण तर एका वेळी पूर्ण पुडासुद्धा संपवतो. त्यामुळं पाकिटावर उल्लेख केल्यानुसारच त्यातला पदार्थ सेवन करावा. पदार्थ आकर्षक आणि चविष्ट होण्यासाठी त्यात आर्टिफिशिअल कलर आणि फ्लेवर मिसळतात. सरकारी मानकांनुसार त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. या घटकांमुळं काही त्रासही होऊ शकतो.

ब्रेड आणि त्यांचे प्रकार

अलीकडे अनेक प्रकारचे ब्रेड बाजारात आहेत. गव्हाचा ब्रेड हा त्यातल्या त्यात चांगला मानला जातो. एका वेळी एकच स्लाइस खावी. अनेकांसाठी गव्हातलं प्रोटीन अर्थात ग्लूटेन पचवणं त्रासदायक असतं. यात फायबर अधिक असतात. व्हाइट ब्रेडमध्ये फायबर काढून रिफाइंड मिसळलं जातं. हा तुलनेनं जास्त मऊ असतो. हा पूर्णपणे प्रक्रिया केलेला पदार्थ आहे. त्यामुळं ब्राउन ब्रेड शरीराला चांगला असं म्हणतात. मल्टिग्रेन ब्रेड हा मधुमेहींसाठी धोकादायक आहे. साखरेच्या तुलनेत लवकर रक्तात मिसळतो. यामुळं जाडी वाढू शकते.

चिप्स, ज्यूस, कोल्ड्रिंक्स

चिप्स खाण्याची इच्छा असेल तर फक्त घरी तयार केलेलेच खावेत. मधुमेहींसाठी हे त्याज्य आहे. चिप्सची सर्व्हिंग अमाउंट ही फक्त 2 - 3 तुकडे इतकीच असते. कोणत्याही तळलेल्या पदार्थात तेल असतंच. तेलाचा उल्लेखही पाकिटाच्या शेवटी केलेला असतो. ज्यूसमध्ये फायबर्स उत्तम असतात. साखर न घातलेला 100 मिलिपर्यंतचा ज्यूस प्यावा. कमीत कमी घटकांसह तयार झालेला पदार्थ उत्तम असतो. 3-4पेक्षा जास्त घटक पदार्थ वापरले गेले तर पदार्थ शरीरासाठी चांगला नाही, हे समजून घ्या. कोल्ड्रिंक्समध्येसुद्धा रंग मिसळूनच त्याची विक्री होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.