तासगाव : ''राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूणच, राज्यभरात मतदारांमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे चित्र दिसले,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) स्टार प्रचारक रोहित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सांगलीतही तेच चित्र असेल, असेही ते म्हणाले.
आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत या वेळी घेतले होते. राज्यातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून ते राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी फिरताना दिसले. वर्धा, दिंडोरी, शिरूर, बारामती, माढा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक या मतदारसंघांत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या.
सांगली लोकसभा मतदारसंघातही तासगाव येथेही महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यासाठीही त्यांनी उपस्थिती लावली होती. प्रचारासाठी फिरताना आलेल्या अनुभवाबद्दल रोहित पाटील म्हणाले, ''मतदारांमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे जाणवले. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे, नोकऱ्या यांबाबत मतदार बोलत होते. महाविकास आघाडीने या मुद्द्यांना प्राधान्य दिले असल्याने मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभे असल्याची चित्र सर्वत्र दिसले.''सांगली लोकसभा निवडणुकीत काय होणार, यावर उत्तर देताना, ''राज्यात भाजप विरोधी लाट जाणवत होती. तसेच सांगलीमध्ये वातावरण असेल,'' असे मिश्कीलपणे ते म्हणाले. सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे काम केले नाही, या प्रश्नाला मात्र त्यांनी चार तारखेला याचे उत्तर मिळेल, असे सांगून प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.