लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेस नेत्याची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलंय. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मध्यस्थीनंतर नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेतला. यावेळी रमेश चेन्निथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रमेश चेन्निथला यांनी यावेळी सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबतही माहिती दिली. सांगलीची जागा शिवसेनेला दिल्यानं नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलीय.
कोल्हापुरात बंडखोरी केल्यानं काँग्रेसने बाजीराव खाडे यांच्यावर कारवाई केली. पण अद्याप सांगलीत विशाल पाटील यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याबद्दल महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी एकजूट आहे आणि सांगलीची जागा आम्ही शिवसेनेला दिली आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सांगलीत आमचं समर्थन शिवसेनेच्या उमेदवाराला आहे. तर कोल्हापूरचा उमेदवार इतका महत्वाचा न्हवता.आज आपल्या देशात निवडणूका होतं आहेत. 3 टप्पे झाल्यावर इंडिया आघाडीला लोकांचं समर्थन आहे. इंडिया आघाडी केंद्रात सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रमध्ये सगळ्यात जास्त सीट्स मविआला मिळणारं आहेत. डबल इंजिन महाराष्ट्र मध्ये नाही चालणार. महाराष्ट्रच नाही तर देशात हे सरकार चालणार नाही आहे असंही चेन्निथला म्हणाले.
कोल्हापुरातील बंडखोर नेत्यावर कारवाई
कोल्हापुरात बाजीराव खाडे यांनी शाहू महाराजांविरोधात बंडखोरी केली. यानंतर काँग्रेसने बाजीराव खाडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. बाजीराव खाडे हे टीम प्रियांका गांधींचे सल्लागार होते. त्यांच्याकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदाचीसुद्धा जबाबदारी होती. गेल्या २७ वर्षांपासून काम करूनही आपली दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
सांगलीच्या जागेवरून वाद
सांगलीच्या जागेवरून महाविकासआघाडीमध्ये मोठा वाद झाला होता. उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा जाहीर करून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. अखेर जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली. यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विश्वजीत कदम यांनीही सुरूवातीच्या काळात विशाल पाटलांना बळ दिलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.