Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज?शरद पवार यांचा शिरूर मधून हल्लाबोल

इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज?शरद पवार यांचा शिरूर मधून हल्लाबोल 


इंग्रजांना घालवण्यासाठी कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांना घालवले, तर मोदी काय चीज? असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिरूर येथे जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत आहे. लोकशाहीत दिलेले मत त्यांना सहन होत नाही. ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असेही ते पुढे म्हणाले.नरेंद्र मोदी हे एखाद्या समाजाचे पंतप्रधान नसून, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य करून ते गैरसमज पसरवित आहेत. त्यामुळे देशाच्या ऐक्याला हे घातक आहे. जे देशाच्या हिताचे नाही, ज्या लोकशाहीवर ज्या विचारधारेचा विश्वास नाही, अशा विचारसरणीबरोबर मी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू, असा घणाघात शरद पवार यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारधारा ही देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारानेच आपल्याला पुढे जावे लागेल. मोदी यांची नुकत्याच झालेल्या काही जाहीर सभांमधील भाषणातून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे झाले आहेत. त्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच ती अशी वक्तव्य करीत असावीत.

अरविंद केजरीवाल यांची सुटका न्यायालयाने केली त्याचा मला आनंद आहे. अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले, पत्रकारांना तुरुंगात टाकायचे? गृहमंत्री यांना तुरुंगात टाकायचे? ही वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. पण इंग्रजांना घालवण्यासाठी कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांना घालवले, तर मोदी काय चीज? असा सवालही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी दौरा केला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, तर मोदी त्यांना शहाजादे म्हणतात. त्यांच्या धोरणावर टीका करा, भाषणावर टीका करा, पण त्यांच्यावर वैयक्तिक टीका का करता? त्यांच्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले, इंदिरा गांधींनी देशासाठी योगदान दिले. नेहरू जेलमध्ये राहिले त्यांच्यावर टीका करतात, अशा शब्दात पवारांनी मोदींवर सडकून टीका केली. मी मोदींचे वक्तव्य मुस्लीम समाजाबाबत ऐकलं. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, तर सर्वांना एकत्रित घेऊन देश पुढे न्यावा लागेल. एका समाजाबाबत आपण वेगळे मत मांडले तर ऐक्य राहणार नाही. मोदींची अलीकडची वक्तव्ये ही समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. तिथे मी आणि आमचे सहकारी असणार नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.