पुणे : 'माझे विवाहबाह्य संबंध आहेत. हे संबंध तू स्वीकार. कारण असे संबंध ठेवणे कायद्याने गुन्हा नाही. मात्र तुला हे संबंध मान्य नसतील तर आपण घटस्फोट घेऊ,' असे स्पष्ट करत जोडपे विभक्त होत असल्याचे प्रकार घडत आहेत.
विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही. मात्र ते घटस्फोटाचे कारण होवू शकते, असा निकाल काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यापूर्वी विवाहबाह्य संबंधांना गुन्हा समजला जात. बदलत असलेल्या समाजाच्या अनुषंगाने समाजहीत लक्षात घेत हा बदल करण्यात आला होता. मात्र त्याचा काही कौटुंबिक वादात गैरफायदा घेतला जात असल्याचे घडत आहे. घटस्फोट घेण्यासाठी आपल्या साथीदाराला विवाहबाह्य संबंधांची माहिती दिली जात असून ते स्वीकार नाहीतर आपण घटस्फोट घेवू, असा प्रस्ताव दिला जात आहे.
विवाहबाह्य संबंधाची व्याख्या काय?
भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ मध्ये विवाहबाह्य संबंधांची व्याख्या नमूद आहे. 'एखादी महिला दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे किंवा पत्नी असण्याची शक्यता आहे. अशा महिलेसोबत तिच्या पतीच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे विवाहबाह्य संबंध. यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, दंड भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. अशा गुन्ह्यांमध्ये पत्नीवर (महिलेवर) कारवाई केली जात नाही.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल
२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधाबाबत ऐतिहासिक निकाल दिला होता. पुरुष-स्त्री दोन्ही समान आहेत. विवाहबाह्य संबंधात पती, पत्नीचा मालक होऊ शकत नाही,' असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, असा निर्णय पाच सदस्यांच्या खंडपीठाने दिला होता. या निकालामुळे १५८ वर्षांपूर्वीचे भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ अवैध ठरले आहे.कोणताही कायदा तयार करताना त्यात समाजाच्या हिताचा विचार केला जातो. एक व्यापक सामाजिक विचार त्यामागे असतो. विवाहित स्त्रियांवरील घरगुती वा कौटुंबिक हिंसाचार, क्रूरता याच बरोबरीने तिच्यावरील किंवा तिला होणाऱ्या मानसिक त्रासाचे निराकरण करण्यासाठी '४९८ अ' कलमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. असेच काहीसे आता विवाहबाह्य संबंधाच्याबाबत होत आहे. या प्रकारांमुळे कुटुंब व्यवस्थेला धक्का पोचत आहे.
- सुनीता जंगम, कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टीस करीत असलेल्या वकील
उदाहरण : येथील कौटुंबिक न्यायालयात नुकताच घटस्फोटाचा एक दावा दाखल झाला आहे. त्यातील पतीने पत्नीला सांगितले की, माझे कार्यालयातील एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. हे संबंध तू स्वीकार कर. मात्र हे संबंध पत्नीला मान्य नव्हते. त्यामुळे झालेल्या वादातून जोडप्याने संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.