पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनीही आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली.
व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय?
कहानी अतृप्त आत्म्याची! असं कॅप्शन देत रोहित पवारांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. "अतृप्त आत्मे पांढरा हाफ शर्ट घालून उन्हातानात फिरत नाही, तर दिवसाला जे पाच वेळा कपडे बदलतात ते अतृप्त आत्मे असतात. संकट आस्मानी असो किंवा सुलतानी अतृप्त आत्मे मदतीला धावत नाही, तर जवान शहीद झाले, तरी जे जंगलात शुटींग करतात, ते अतृप्त आत्मे असतात. रडार दिसलं की ढगामागे आणि रडायला आलं की मंगळसुत्रामागे लपतात, ते अतृप्त आत्मे असतात. अतृप्त आत्मे महिलांच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही, तर महिलांची धिंडही कोरड्या डोळ्याने बघतात. अतृप्त आत्मे भर पावसात चिंब भिजत नाही, तर ज्यांना कॅमेरा महत्त्वाचा, ते अतृप्त आत्मे असतात. हजारो कोटींच्या विमानातून फिरले तरी स्वत:ला फकीर म्हणतात, ते अतृप्त आत्मे असतात", अशी टीका या व्हिडीओतून करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?
पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. "महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती, तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात", असे ते म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.