सांगली : सांगलीवाडी येथे मध्यरात्रीनंतर चोरीसाठी आलेल्या दोघांना पकडताना एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पलायन केले. त्यानंतर दुसऱ्यास पकडले असता त्याने चाकूने वार करून पलायन केले. हल्ल्यात जखमी लालसाब मौलासाब शेख (वय ३९ रा. विश्वास कारखाना कॉलनी, चिखली, ता. शिराळा) यांनी संशयित सागर धुमशा पवार (वय ३०, नांद्रे) व साथीदाराविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी लालसाब शेख हे त्यांच्या भावाकडे सांगलीवाडी येथे आले होते. रात्री १.३० च्या सुमारास त्यांना भावाच्या घरासमोरील झाडाच्या मागे दोघेजण थांबलेले दिसले. लालसाब यांनी संशयितांना, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करीत आहात असे विचारले. त्यावेळी दोघा संशयितांनी तेथून पलायन केले.लालसाब यांनी पाठलाग करून एकास पकडले असता त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तो पसार झाला. तर दुसऱ्या संशयितास पकडले असता त्याने जवळ असलेल्या चाकूने लालसाब यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हातास, मनगटाजवळ दुखापत झाली. त्यानंतर दोघेजण पळून गेले. जखमी लालसाब यांनी याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर धुमशा पवार व साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.