बिहारमधील वैशाली हा जिल्हा सगळ्यांना माहिती आहेच. वैशालीची नगरवधू आम्रपाली आणि तेथील राजेमहाराजांचे अनेक किस्से आहेत. एक सुंदर तरुणी ते नगरवधू आणि बौद्ध भिक्षूणी असा आम्रपालीचा प्रवास आहे. एका गरीब दांपत्याला आंब्याच्या झाडाखाली एक मुलगी सापडली. तिचे आईवडील कोण होते काहीच माहिती नाही. आंब्याच्या झाडाखाली सापडली म्हणून तिचं नाव आम्रपाली असं ठेवण्यात आलं. आम्रपाली वयात आली तेव्हा तिचं सौंदर्य हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला.
राजापासून ते व्यापाऱ्यापर्यंत त्या नगरातील प्रत्येक पुरुषाला तिच्याशी विवाह करायचा होता. आम्रपालीने कोण्या एका पुरुषाची निवड केली असती तर बाकीच्यांनी गोंधळ घातला असता. त्यामुळे तिचे आई-वडिल चिंतेत होते. वैशाली नगरीच्या प्रशासनापर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर आपल्या नगरीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्रपाली हिला नगरवधू घोषित करण्यात आलं. सात वर्षांसाठी तिला 'जनपद कल्याणी' अशी उपाधीही देण्यात आली. ही उपाधी नगरीतील सर्वात सुंदर महिलेला दिली जात असे. या उपाधीमुळे आम्रपालीला तिचा महाल मिळाला. दास-दासी मिळाले. कोणत्या पुरुषाशी संबंध ठेवायचा हे निवडण्याचा अधिकार मिळाला आणि दरबारातील नर्तकीचा मानही मिळाला.
इतिहासकारांच्या मते आम्रपालीचा जन्म 2500 वर्षांपूर्वी वैशाली नगरीतील आंब्याच्या बागेत झाला. महनामन नावाच्या एका सामंताला ती मिळाली. त्या सामंताने नंतर पदाचा त्याग केला आणि तिला घेऊन तो आंबारा गावी गेला. आम्रपाली 11 वर्षांची झाल्यानंतर तो तिला घेऊन पुन्हा वैशाली येथे आला. अवघ्या 11 वर्षांच्या आम्रपालीच्या सौंदर्याने भारावलेल्या वैशाली नगरीने तिला 'कल्याणी' ही उपाधी बहाल केली. त्यामुळे कायद्यानुसार तिला राजनर्तकीही व्हावं लागलं. प्रसिद्ध चिनी प्रवासी फाह्यान आणि व्हेनसांग यांच्या प्रवास वर्णनांमध्येही वैशाली आणि आम्रपाली यांचे उल्लेख आढळतात. या दोघांनीही आम्रपाली ही अद्वितीय सौंदर्यवान असल्याचं म्हटलं आहे.
आम्रपालीचं सौंदर्य हे त्यावेळी प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरलं होतं. तिची एक छबी दिसावी यासाठी किती तरी पुरुष, राजेमहाराजे, व्यापारी हे वैशाली नगरीच्या वेशीवर घुटमळत असत. परदेशी प्रवाशांच्या लेखनात आम्रपालीच्या सौंदर्याचं वर्णन आहे तसं वैशाली हे अत्यंत श्रीमंत आणि संपन्न शहर असल्याचे उल्लेख आहेत. गौतम बुद्ध आपल्या ज्ञान तपश्चर्येनंतर सर्वप्रथम वैशाली नगरीमध्ये आले. सुमारे 84,000 नागरिक त्यांच्या स्वागतासाठी आले होते. गौतम बुद्धांची कीर्ती ऐकून आम्रपाली देखिल आपल्या दासींसह सोळा श्रृंगार करुन त्यांच्या स्वागतासाठी पोहोचली. त्यावेळी गौतम बुद्धांनी आपल्या साथीदारांना डोळे मिटून घेण्यास सांगितलं. कारण तिच्या सौंदर्याने साथीदारांचे डोळे दिपतील हे गौतम बुद्ध जाणून होते. बुद्धांनी तीन वेळा वैशाली परिसराचा दौरा केला आणि आपल्या आयुष्यातील बराच काळ व्यतीत केला. त्यांनी आपल्या निर्वाणाची घोषणाही इथेच केली होती. वैशालीजवळ असलेल्या कोल्हुआ इथे बुद्धांनी आपलं शेवटचं भाषण दिलं होतं. तिथेच संपन्न झालेल्या संगीत सोहळ्यात बौद्ध धर्मात दोन गट पडले होते.गौतम बुद्धाने स्थापन केलेल्या क्षुणी संघाची स्थापना केली तेव्हा या संघाद्वारे आम्रपाली हिने स्त्रीच्या सन्मानाला महत्त्व दिलं. जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बुद्धाला आपल्या मानवतेने आकर्षित करणाऱ्या आम्रपालीची कला आजही उपेक्षित आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासात आम्रपालीने गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांना भोजनाला निमंत्रित करुन आम्रकानन भेट दिल्याच्या घटनेची नोंद आहे. त्यानंतर बुद्धांनी बौद्ध धर्मात महिलांना प्रवेश दिला असं म्हटलं जातं. त्यानंतर आम्रपाली हिने बौद्ध भिक्षूणी म्हणून आपलं जीवन व्यतीत केलं. वैशाली नगरीच्या हितासाठी ती कार्यरत राहिली. याबाबत एक आख्यायिका अशी की, आम्रपाली एका बौद्ध भिक्षूच्या प्रेमात पडली. तिने त्या भिक्षूला भोजन आणि प्रवासासाठी निमंत्रित केलं, मात्र त्याने आपण आपले गुरु गौतम बुद्ध यांची परवानगी असेल तरच हे निमंत्रण स्विकारु असं आम्रपालीला सांगितलं. त्यानंतर मी माझ्या सौंदर्याची मोहिनी बौद्ध भिक्षूवर घालू शकले नाही मात्र त्यांच्या आध्यात्माने माझ्यावर मोहिनी घातली, असं म्हणून आम्रपाली हिने भिक्षूणी व्हायचं ठरवलं.आम्रपाली हिला प्राप्त करण्यासाठी अनेक राजामहाराजांनी प्रयत्न केले. मगध सम्राट बिंबिसार याने वैशालीवर आक्रमण केलं. त्यानंतर त्याची पहिली भेट आम्रपालीशीच झाली. या भेटीत तिच्या सौंदर्याने मोहित झालेल्या बिंबिसाराला तिने युद्ध थांबवण्याची विनंती केली. त्याने त्वरित युद्ध थांबवलं. त्याने तिला मगधची महाराणी हो अशी मागणी घातली मात्र वैशाली आणि मगध ही राज्य एकमेकांची शत्रु असल्याने तिने तसं करण्यास नकार दिला. आम्रपालीला बिंबिसार राजापासून एक पुत्र झाला आणि तो पुढे बौद्ध भिक्षू झाला. बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रु आणि आम्रपाली एकमेकांवर प्रेम करत होते. वैशाली राज्यात याबाबत माहिती होताच आम्रपालीला तुरुंगात टाकण्यात आलं. याबाबत माहिती मिळताच अजातशत्रूने वैशालीवर आक्रमण केलं आणि अनेकांचा जीव घेतला. या घटनेने आम्रपालीला खूप दुःख झालं.
गौतम बुद्ध आणि आम्रपाली यांच्याबद्दलही अशीच एक आख्यायिका सांगितली जाते. गौतम बुद्ध वैशाली नगरीत आले तेव्हा त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड गर्दी जमली होती. या गर्दीत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक होते. गौतम बुद्धांनी आपल्या निमंत्रणाचा स्विकार करावा अशी त्यातल्या प्रत्येकाचा इच्छा होती. आम्रपालीही त्यापैकीच एक होती. आपल्या जीवनाचा त्याग करुन बौद्ध भिक्षूणी व्हायची तिची इच्छा होती. त्यामुळे तिनेही गौतम बुद्धांना भोजनाचं निमंत्रण दिलं. बुद्धांनी तिचं निमंत्रण स्विकारलं आणि ते तिच्या घरी गेले. त्यांच्या अनुयायांनी मात्र त्यांनी एका गणिकेच्या घरी जाण्याच्या घटनेचा निषेध केला. त्यावर आम्रपाली ही गणिका असली तरी तिने स्वतःला पश्चात्तापाच्या आगीत निर्मळ केल्याचं गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितलं. जे धन मिळवण्यासाठी माणसं जीवाचं रान करतात ते धन आम्रपालीने मात्र सहज त्यागलं आहे. असं असताना मी तिचं निमंत्रण कसं नाकारायचं? तुम्ही स्वतःच विचार करा आणि सांगा, की तिला खरंच अपवित्र मानायचं का? असा सवाल गौतम बुद्धांनी सर्वांना विचारला. हे ऐकताच गौतम बुद्धांच्या अनुयायांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी बुद्धांची क्षमा मागितली आणि बुद्धांनीही मोठ्या मनाने त्यांना माफ केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.