शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे. पवारांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. नुकतेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील २ पक्ष लोप पावतील असं वक्तव्य केले होते. त्यानंतर शरद पवारांच्या या विधानामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार म्हणाले की, पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे असं पवारांनी म्हटलं. इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत पवारांनी हे विधान केले. त्यामुळे भविष्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे. तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही.
वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामुहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे ते पचवणे कठीण आहे असंही शरद पवारांनी पुढे सांगितले.
दरम्यान, अनेक प्रादेशिक पक्षातील नेत्यांच्या दुसऱ्या पिढीचे सत्तेकडील झुकणं पाहता पवारांनी हे विधान केले आहे. सपा, आरजेडी, एलजेपी, वायएसआरसीपी, टीडीपी, बीआरएससारखे जे पक्ष स्थापन झालेत, त्यांच्या नेत्यांच्या मुलामुलीपर्यंत कथित भ्रष्टाचार, घराणेशाहीचा आरोप होत आहेत. त्यामुळे एका व्यापक दृष्टीने ते सर्व एका छताखाली येऊन लढाया लढतील असं मत शरद पवारांनी मांडले.
उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच
उद्धव ठाकरे हेदेखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे ती आमच्यासारखीच आहे असंही शरद पवारांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.