मागील काही दिवसांपासून देशभरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. अशातच देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका राजकीय नेत्यांनाही बसतो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही उन्हामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधीनी भाषणदरम्यान चक्क थंड पाणी डोक्यावर ओतले. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
राहुल गांधी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी रुद्रपूरमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी पाणी पिण्यासाठी बॉटल हातात घेतली. तेवढ्यात नागरिकांनी गर्मी गर्मी असं म्हणत ओरडायला सुरुवात केली. तेवढ्यात आज जास्तच गर्मी आहे, असं म्हणत त्यांनी थेट थंड पाणीच डोक्यावर ओतले. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "ही लढाई विचारधारेची लढाई आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे ते लोक आहेत, ज्यांना संविधान बदलायचं आहे. भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचे जाहीरपणे सांगितलं आहे. मात्र, इंडिया आघाडी असं कधीही होऊ देणार नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने देशातील मागसवर्गीयांना त्यांचा हक्क मिळाला आहे. याच संविधानाने त्यांना आरक्षण दिलं आहे. मात्र, भाजपाला दलित-पीडितांचे आरक्षण रद्द करायचं आहे", असे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी अग्नीवीर योजनेवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केलं. "अग्नीवीर योजनेद्वारे मोदी सरकारने देशातील सैनिकांना मजदुरांमध्ये बदलण्याचं काम केलं आहे. आता सीमेवर शहीद झाल्यास त्यांना पेन्शन किंवा शहिदांचा दर्जा मिळणार नाही. मात्र, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आम्ही ही योजना रद्द करू", अशी टीका त्यांनी केली."पंतप्रधान मोदी म्हणतात की त्यांचा जन्म आईवडिलांपासून झाला नाही, परमेश्वाराने त्यांना एका उद्देशाने पाठवलं आहे. मात्र, खरं हे की परमेश्वराने त्यांना अदाणी-अंबानी यांच्या मदतीसाठी पाठवलं आहे. जर त्यांना खरंच परमेश्वराने पाठवलं असतं तर त्यांनी देशातील गरिबांसाठी आणि वंचितासाठी काम केलं असतं. मात्र त्यांच्या परमेश्वाराने त्यांना सांगितलं की जा आणि अदानी अंबानीची मदत करा", असा टोलाही त्यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.