महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. मोदी मुंबईत रोड शो करणार असून कल्याण आणि नाशिकच्या दिंडोरी येथे जाहीर सभा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कांदा प्रश्नावरुन जाब विचारण्याची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत.
तर काही जणांची धरपकड देखील करण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलन केल्यास संबंधितांना जबाबदार धरण्याची तंबी देण्यात आली आहे. तसेच मोदींच्या सभेमुळे दोन दिवस पिंपळगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेली निर्यातबंदी जवळपास ४ महिन्यानंतर हटवली. पण निर्यात शुल्क आकारल्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहेत. बुधवारी नरेंद्र मोदी याच जिल्ह्यात दुपारी २ वाजता जाहीर सभा घेणार आहेत.
कांद्यावर निर्यातबंदी घालणाऱ्या पंतप्रधानांना जाब विचारू असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी काही शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा पाठवल्या आहेत. काही शेतकऱ्यांना नजरकैदेत देखील ठेवण्यात आल्याची माहिती आहे.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिग्रोळे यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. मोदींच्या सभेदरम्यान कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची देखील धरपकड करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांदा निर्यात बंदीमुळे झालेले नुकसान हा कळीचा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, मोदींच्या सभेप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सभास्थळी काळे कपडे परिधान करून वा कांदा घेऊन कुणी प्रवेश करणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.