अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, "पारावरचे लोक म्हणतात दादांनी 'या ' वयात साहेबांना सोडायला नको होतं, मी त्यांना कधीही....."
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा जवळ येतो आहे. वाढत्या उन्हासह लोकसभेची निवडणूकही तापू लागली आहे. अशात महाराष्ट्रातलं सर्वाधिक राजकीय वातावरण ज्या ठिकाणी तापलं आहे तो मतदारसंघ आहे बारामती. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना आहे. ज्याकडे अजित पवार विरुद्ध शरद पवार असंही पाहिलं जातं आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली याबाबत पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. इंदापूरच्या सभेतलं त्यांचं वक्तव्य चर्चेत आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“ही निवडणूक गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही. देशाचा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी हा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे हे विसरु नका. वेळ कमी उरलेला आहे त्यामुळे दुपारच्या उन्हात सभा घ्यावी लागते आहे. आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिले आहात त्याबद्दल मी स्वागत करतो, आभार मानतो. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की अजित पवारांनी हा निर्णय का घेतला. आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली आहे. १९८४ मध्ये भवानीमाता पॅनल केलं होतं तिथे मला संचालक केलंत. तिथून माझी राजकीय सुरवात झाली. राजकारणात येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे. एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल होणार तर नाही सांगतो. मला उगाच कुणाला हेलपाटे घालून द्यायला आवडत नाही. ” असं अजित पवार म्हणाले.
मी शरद पवारांचंच ऐकत आलो आहे
“हर्षवर्धन पाटील आणि मी विकासासाठी एकत्र आलो. तुम्ही आमच्यातले आरोप-प्रत्यारोप पाहिले आहेत. मात्र आपला देश महासत्ता व्हावा, सर्व जाती-धर्माचे लोक वंचित राहू नये ही आमची भूमिका आहे.” “काही जण म्हणतात या वयात दादांनी साहेबाला सोडायला नको होतं पारावर अशी चर्चा करतात. मित्रांनो मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब (शरद पवार) म्हणतील ती पूर्व दिशा. मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. लहान असताना आजी आजोबांनी सांगितलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गी वसंत दादा पवार हे पोटनिवडणुकीला उभे होते. त्यावेळी शरद पवार हे महाविद्यालयात होते. त्यावेळी शरद पवारांनी आमच्या थोरल्या काकांना विरोध केला. अख्खं पवार कुटुंब शेकापच्या बाजूने होतं. त्यावेळी शरद पवारांनी विरोधी काम केलं. ही सुरुवात झाली. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार उभे राहिले. प्रत्येकाला संधी मिळते. हर्षवर्धन पाटील यांनाही नंतर संधी मिळाली. शरद पवारांनी मला संधी दिली. शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांनी निवडणुकीची संधी दिली होती.
१९७२ पासून शरद पवारांनी काय केलं?
“१९७२ मध्ये शरद पवार राज्यमंत्री होते. १९७५ ला राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाले. १९७८ ला शरद पवारांनी सरकार कारभार करत होतं. वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं आणि पुलोदचा प्रयोग केलं. त्यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांचं ऐकलं नाही. वास्तविक शरद पवारांना यशवंतरावारांनी संधी दिली होती. पण शरद पवारांनी त्यांचं ऐकलं नाही. १९८० मध्ये निवडणुका झाल्या, सरकार बरखास्त केलं होतं. त्यानंतर अंतुले मुख्यमंत्री झाले होते. १९८६ डिसेंबरला आपल्याला सांगितलं की समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करायची. १९८८ ला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९९० मध्ये निवडणुका झाल्या आणि शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले. १९९१ ला मी खासदारकीचा राजीनामा दिला राज्यात आलो आणि शरद पवार तिकडे मंत्री झाले. त्यानंतर अनेकदा ते केंद्रात कृषी मंत्री होते. बॉम्बस्फोटानंतर पुन्हा राज्यात आले. १९९५ मध्ये युतीचं सरकार आलं तेव्हाही भुजबळ विरोधात बसले आणि शरद पवार दिल्लीला गेले. कुठलाही शब्द पडू दिला नाही.”
१९९९ ला सोनिया गांधी विदेशी हा मुद्दा शरद पवारांनीच उपस्थित केला होता
“मात्र नंतरच्या काळात काही गोष्टी बदलल्या. १९९९ ला शरद पवारांनी असा मुद्दा काढला की सोनिया गांधी विदेशी आहेत. राजीव गांधींच्या त्या पत्नी असल्या तरीही विदेशी आहे. आपल्या देशात जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नाही असं कसं चालेल? असा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. संगमा, तारिक अन्वर आणि शरद पवारांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पक्षातून काढण्यात आलं. मग राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. हे सगळं आपण पाहिलं. ऑक्टोबर १९९९ मध्ये सांगितलं काँग्रेस बरोबर जायचं. सोनिया गांधींचा विदेशी असण्याचा मुद्दा शरद पवारांनीच काढला होता तो सोडून दिला. तेव्हा आम्ही काही बोलू शकलो नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. आमचे केस काळ्याचे पांढरे झाले. सगळे सहकारी साथ देत होते. कुठेही अंतर ठेवलं नाही. हे सगळं होत असताना नंतरच्या काळात २००४ मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते. मला विलासराव देशमुख म्हणाले की तुमचा मुख्यमंत्री कोण ? मला मॅडमनी (सोनिया गांधी) सांगितलं की आपला मुख्यमंत्रीपदावर दावा नाही. आपण उपमुख्यमंत्रीपद घेऊ. पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. चार मंत्रिपदं वाढवून घेतली. आदेश तेव्हाही आम्ही ऐकला. आत्ता जे केलंय ते २००४ ला केलं असतं खूप बरं झालं असतं. आता काय करता?” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
२०१४ ला भाजपाला बाहेरुन पाठिंबा
“२०१४ मध्ये निवडणूक निकाल लागला त्याचदिवशी भाजपाला बाहेरुन पाठिंबा शरद पवारांनी जाहीर केला होता. त्यांना विचारलं आपण तर विरोधात लढलो होतो. तर मला म्हणाले हे आपलं धोरण आहे. यांनी केलं की धोरण. मी केलं की गद्दारी आणि वाटोळं का? धोरणच आहे म्हटल्यावर मी गप्प बसलो. आम्हाला सांगितलं सगळ्यांनी फडणवीसांच्या शपथविधीला जा, आम्ही शपथविधीला गेलो होतो. काही महिन्यांनी आपल्याला या सरकारमध्ये जायचं असं शरद पवारांनीच सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांत अलिबागला मिटिंग झाली. त्यात जाहीर करण्यात आलं की भाजपाने आमचा (राष्ट्रवादीचा) पाठिंबा गृहीत धरु नये. त्याच संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडली आणि शिवसेना सरकारमध्ये गेली. २०१४ ते २०१९ पूर्ण सरकार चाललं. २०१७ मध्ये सुनील तटकरेंना बोलवून घेतलं होतं. तेव्हाही भाजपासह जायची बैठक झाली. पालकमंत्री कोण, कुठली खाती कुणाला ते ठरलं. तेव्हा दिल्लीत अमित शाह यांना भेटलो. शरद पवार अमित शाह यांना म्हणाले शिवसेना जातीयवादी पक्ष आहे तो अजिबात चालत नाही. त्यावर अमित शाह म्हणाले शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे त्यांना डावलून तुम्हाला बरोबर घेणार नाही. तुम्हाला बरोबर यायचं आहे तर या आपण तिघं सत्तेत राहू. पण तिथेही सगळं बारगळलं. २०१७ च्या चर्चा फिस्कटल्या.”
२०१९ ला भाजपाबरोबर जायचं हे शरद पवारांनीच ठरवलं होतं
“२०१९ ला भाजपाबरोबर पाच ते सहा मिटिंग झाल्या होत्या. तिथे सगळं ठरलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री कुठली खाती कुणाला? पालकमंत्री कोण? हे ठरलं होतं. अमित शाह यांनी मला तेव्हा बाजूला घेतलं आणि म्हणाले हे बघ अजित पहिला तुमचा अनुभव काही बरा नाही. तुझ्या देखत जसं ठरलं तसं तुला वागावं लागेल. मी त्यांना शब्द दिला हो मी तसंच वागणार. मला काय माहीत काय होणार? मी त्यांना शब्द दिला. इतकं सगळं ठरल्यानंतर मी मागे कशाला फिरु? मुंबईत आलो. त्यानंतर आम्हाला सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार करायचं आहे. मी म्हटलं अहो त्यांना (भाजपाला) आपण शब्द दिलाय. तर मला म्हणाले हे आपलं धोरण आहे. मी गप्प राहिलो. त्यानंतर बैठका सुरु असताना खरगे आणि शरद पवार यांचा काहीतरी खटका उडाला. खरगे काहीतरी बोलले साहेब चिडले आणि बाहेर गेले.त्यानंतर मला त्यांनी सांगितलं अजित तू आणि प्रफुल पटेल यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. हे काही आपल्या बरोबर राहात नाहीत असं दिसतंय ठरल्याप्रमाणे काय ते करा. मी वर्षावर जायचं ठरवलं आणि म्हटलं ठरलंय तसं करतो. तेवढ्यात जयंत पाटील आले मला म्हणाले कुठे चाललात? तर मी त्यांना सांगितलं वर्षावर चाललो आहे जे ठरलंय त्याप्रमाणे करतो. तर मला जयंतराव म्हणाले ठरलंय तसं करा पण दाराला थोडी फट ठेवा. मी बरं म्हटलं. त्यानंतर मी गेलो, राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती. राष्ट्रपती राजवट होती ती उठवली. पण सकाळी आठला आम्ही शपथ घेतली. पुन्हा सूत्रं फिरवली. सगळे आमदार परत तिकडे (शरद पवारांकडे) गेले. काँग्रेस तेव्हा सुप्रीम कोर्टात गेला होता. त्यानंतर गुप्त मतदान सोडून उघड मतदान करायला लावलं त्यामुळे ते सरकार गेलं. मला नंतर उपमुख्यमंत्री केलं कारण सगळ्यांची ती मागणी होती.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.