सांगली, ता. ४ : राज्यातील महायुती सरकारने 'बार्टी'च्या धर्तीवर राज्यात 'आर्टी' स्थापन करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय दिला आहे. तसेच मातंग समाजाच्या गेली ४० वर्षे सुरू असणाऱ्या मागण्याही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असून सांगलीत खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत, अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिली.
दलित महासंघाचे नेते प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी सांगलीत आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ७५ वर्षात ज्यांना पाठिंबा दिला, त्यांनी आम्हाला काय दिले? शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने मातंग समाजाच्या बाबतीत अनेक चांगले निर्णय घेतले यासाठी चाळीस वर्षे आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला.
यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे वाटेगावचे स्मारक दर्जेदार करण्यासाठी २५ कोटी जाहीर केले आहेत. तसेच मुंबईत चिरागनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी ३०५ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय लहुजी वस्ताद यांचे पुण्यात स्मारक होण्यासाठी १०५ कोटीची तरतूद केली आहे. याबरोबरच मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्टिट्यूटची (आर्टी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. महायुती सरकारने आमच्या अस्मितेच्या दृष्टीने निर्णय घेतले.ते म्हणाले, भारताचे संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही. त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. तसेच मनुचे संविधान आणणे शक्य नाही. संविधान बदलल्यास भारताची शकले होतील असा इशाराही त्यांनी दिला. त्याचवेळी आरक्षणही रद्द होणार नसल्याचे ते म्हणाले. संविधान बदलणे आणि आरक्षण रद्द होणे याबाबत महाविकास आघाडीकडून खोडसाळ, खोटा, दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे. दलित बांधवांनी त्यावर विश्वास ठेवू नये. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही माहिती सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांगली लोकसभा मतदारसंघात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी भाजपा माहितीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गावागावातला दलित आणि मातंग समाज हा संजय काकांनाच मतदान करेल आणि त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, हा शब्द मी देतो असेही मच्छिंद्र सकटे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.