शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त सभेत बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा मनातली खदखद व्यक्त केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला केवळ त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही असं अजित पवार यांनी म्हटलं. पवारसाहेब माझे दैवत आहेत यात दुमत नाही. पण ८० वर्षे झाल्यानंतर तरी थांबायला हवं. नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे असं अजित पवार म्हणाले.
मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. मुलगा नाही म्हणून संधी नाही, हा कसला न्याय? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी सक्रीय होण्याआधी साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती. मी राजकारणात आल्यापासून जिल्हा बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आता दिगंबर दुर्गाडे चेअरमन आहे. जिल्हा परिषद ताब्यात आहे.
पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हती, १९९२ पासून २०१७ पर्यंत ताब्यात ठेवलं आणि चांगलं शहर केलं. बारामती कशा पद्धतीने बदलली एकदा येऊन बघा. अनेक लोकं आम्हाला सांगतात आम्हाला निवडून द्या आम्ही बारामतीसारखा विकास करू. कायतरी केलंय ना? की तिथं गोट्या खेळलो का? कामच केलंय ना? अशा शब्दात अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं.महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत अजित पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. या आरोपांनाही अजित पवार यांनी उत्तर दिलं. शिरुरच्या सभेत बरळले अनेकजण, अजित पवारांनी कारखाना बंद पाडला. अजित पवार संचालक नाही की काही नाही, मग अजित पवारांनी कसा बंद पाडला, संचालकांनी कर्ज काढलं, कर्जबाजारी केला त्यांनी आणि माझ्या नावावर पावती फाडता, सोमेश्वर, माळेगावचा भाव जास्त आहे. अशाच संस्था चालवत नाही. काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करतायत.
पवार साहेबांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही या अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित पवार बोलले ते तर स्पष्टच आहे. त्यांनी सांगितलं त्यात आश्चर्य आहे का? पवारसाहेबांसोबत पक्ष अजित पवारांनी उभा केला. पक्षात आपल्याला स्थान मिळणार नाही, स्थान सुप्रिया ताईंनाच देतील म्हणून ते बाहेर पडले. तसंच उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक शरद पवार आहेत आणि त्यांच्याच इशाऱ्याने ते चालतील. पवार साहेब जे बोलतील तेच उद्धव ठाकरे करतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.