निवडणुकांचा हंगाम पुढील दोन वर्ष सुरु राहणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका 2022 पासून झालेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर-डिसेंबर विधानसभा निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. तर 2025 मध्ये टप्प्याटप्प्याने नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना जुंपण्यासाठी राजकीय पक्षांकडून आता स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे आमिष दाखवले जात आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य दिल्यास जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडुकामध्ये तिकीट मिळणार, असे सांगण्यात येत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांचा उपयोग पक्षश्रेष्ठी करीत आहेत.
उमेदवारी पाहिजे असेल तर आपल्या भागातून, विधानसभा मतदारसंघातून लोकसभेचा लीड मिळवून द्या, अशी ॲाफर पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. ज्या मतदारसंघात, गटात, गणात मतदानाची टक्केवारी, लीड कमी असेल तेथील इच्छुकांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असा सज्जड दम पक्षश्रेष्ठींना दिला आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेसाठी इच्छुकांच्या खांद्यावर प्रचाराची मोठी धुरा आहे.प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झाले, त्याचा सखोल अभ्यास भाजपकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर संबधीत इच्छुकाला जिल्हापरिषद, आमदारकीचे तिकीट द्यायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याच्या सूचना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नुकत्याच ठाण्यात दिल्या आहेत.
पक्षाकडून मतदारसंघात दिलेले टार्गेट जिल्हापरिषद, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती निवडणुकीसाठी आहे, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेले सर्वच जण जोरदारपणे प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.