सांगलीतील तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली…निकाल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालाय. विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. मतदानानंतर आता बरचसं चित्र क्लिअर होऊ लागलंय. आणि सांगलीत विशाल पाटलांनी मशाल विझवलीय. असं लोकं सरसकट बोलू लागलेत. यंदा महाराष्ट्रातून अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील (Vishal Patil) हे नाव दिल्लीत सांगलीचा आवाज बनेल. महाविकास आघाडीचं पारडं जड असतानाही विशाल पाटील भारी पडून शिवसेनेची मशाल का विझली? विशाल पाटलांना कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कसं लीड मिळालंय? हेच कट टू कट सांगतोय, हेच जाणून घेऊयात …
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा प्रतिष्ठेची बनेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोन टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्ली वारी केल्यावर काँग्रेसचा हा बालेकिल्ला विशाल पाटलांना खासदार बनवण्यासाठी मनानं आणि मतानं तयार होता. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडला. आणि सांगलीचा तिढा वाढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्मुला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीने तिकिटासाठी ताकद लावली. पण त्याला यश काही आलं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला. निवडणूक चिन्ह मिळालं लिफाफा…
मतदानाच्या दिवशी लढत तीन पाटलांच्यात होती. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील. पण सांगलीत खरी लढत दोघांच्यातच झाली एक म्हणजे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील… ठाकरे गटाची जिल्ह्यातील असणारी कमकुवत ताकद, विश्वजीत कदमांचा मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रहार पाटील निवडणुकीआधीच साईडलाईन झाले. त्यामुळे कमळ विरुद्ध लिफाफा असंच वातावरण मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळालं. पण या लढतीतही अखेर विशाल पाटीलच सरशी मारताना दिसतायत…सांगलीच्या मतदानाची सुरुवात झाली ती विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या एका फोटोने…मतदान केंद्रावरती मतदान झाल्यानंतर दोघांनी एकत्रित फोटो शेअर केला आणि सांगलीला नवा मेसेज दिला. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं म्हणजेच चंद्रहार पाटलांचं काम करणार असं सांगत असले तरी त्यांनी काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद आतून विशाल कदमांच्या पाठीशी लावली होती. मतदानाच्या दिवशीही हे अनेक प्रसंगातून आढळून आलं. दादा पाटील घराण्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला होता. भरीस भर म्हणजे वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला. सुजात आंबेडकरांपासून वंचितची संपूर्ण यंत्रणा प्रचारात विशाल पाटलांच्या पाठीशी होती. त्याचंच प्रतिबिंब मतदानाच्या दिवशीही प्रत्येक बुथवर पाहायला मिळालं. मराठा, दलित, मुस्लिम आणि संजय काकांच्या दोन टर्मच्या कारकिर्दीला कंटाळलेलं मतदारांचं मतही विशाल पाटलांच्या पाठीशीच राहिलं. त्यामुळे यंदा विशाल पाटलांची दिल्ली वारी फिक्स समजली जातेय.विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारडं जड झालंय. पलूस कडेगाव आणि मिरजेमधून विशाल पाटलांना मिळणारं लीड तासगाव मधून संजय काका पाटलांना तोडताना दमछाक झालेली दिसते. त्यामुळे एकट्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका पाटील सांगलीची खिंड लढवताना दिसले. पण विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट ही सांगलीत निर्णायक ठरणारय, असंच सध्या चित्र दिसतंय.
थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेलेलं दिसतंय. सांगलीच्या जागेचा हट्ट करून आपला निर्णय चुकला, याचा ठाकरे गटाला येत्या 4 जूनला नक्कीच पश्चाताप होईल. असं वातावरण निवडणुकीनंतर सध्या तरी सांगलीत पाहायला मिळतय. त्यामुळे येनवेळी उमेदवारी जाहीर करून दादा पाटील घराण्याच्या राजकारणावर तुळशीपात्र ठेवण्याचा डाव विशाल पाटलांनी हाणून पाडला. याउलट भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विद्यमान खासदाराला शह देत, शिवसेनेची मशाल विझवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरलेत. या सगळ्यात आपल्या काँग्रेसची असण्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा हवाला देत, काँग्रेस वरिष्ठांचीही गोची केली. थोडक्यात चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नो मशाल ओन्ली विशाल चा नारा विशाल पाटील समर्थकांनी अखेर खरा करून दाखवलाय, असं बोलायला स्कोप उरतो. हे सगळं पाहता सांगलीत खरंच मशाल विझून विशाल पाटील यांच्या सहानुभूतीचा लिफाफा चालणार का? आणि जर हेच चित्रं असेल तर विशाल पाटलांच्या विजयाचं मार्जिन नेमकं किती असेल?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.