छत्रपती संभाजीनगर : घर विकल्याचे पैसे आल्यानंतर प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिली. त्यासाठी प्रियकराने तीन जणांना शोधून आणले. त्या तिघांनी शनिवारी सकाळी ६:०० वाजताच प्रमोद महाजन क्रीडा संकुलाबाहेर पती गणेश जगन्नाथ दराखे (३५) यांचा गळा चिरून खून केला. या खुनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांनी यश मिळाले आहे. पत्नी, प्रियकर आणि खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
आरोपींमध्ये पत्नी रुपाली गणेश दराखे (रा. नवजीवन कॉलनी, एन ११), प्रियकर सुपडू सोनू गायकवाड (३५, रा. कुऱ्हाड, ता. पाचोरा, जि. जळगाव), अमोल चिंतामण चौधरी (३३), अजय दिलीप हिवाळे (२५) आणि अनिकेत कडुबा चौथे (२४, तिघेही रा. पहुरे कसबे, ता. जामनेर, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गणेश दराखे हे बांधकामावर मिस्त्रीचे काम करीत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चे राहते घर २१ लाख रुपयांना विकले होते. त्यातील ८ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच दराखे कुटुंब एन-११ परिसरात किरायाने राहण्यासाठी आले होते. त्यांच्या पत्नीचे सुपडू गायकवाड याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
या संबंधात मृत गणेश हे अडथळा ठरत होते. पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वाद होत होते. त्यातच घर विकल्याचे पैसे आल्यानंतर पतीचा कायमस्वरुपी काटा काढण्याचा निर्णय पत्नी रुपाली हिने घेतला. त्यासाठी प्रियकर सुपडू याची मदत घेतली. पत्नीने पतीच्या खुनाची दोन लाखात सुपारी दिली. त्यासाठी प्रियकर सुपडूने जामनेर तालुक्यातील तिघांना शोधून आणले. अमोल चौधरी याच्यासोबत दोन लाखांच्या बदल्यात खून करण्याचे ठरले. घर विकल्याचे पैसे होते. त्यातीलच दोन लाख रुपये रुपाली हिने सुपडूला दिले. त्याने ते पैसे अमोल चौधरीला पोहचते केले. त्यानंतर तिघांमध्ये पैशांची वाटणी झाली. गणेश यांचा खून करण्याचा प्लॅन करण्यात आला. त्यानुसार शनिवारी सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडल्यानंतर तिघांनी गळा चिरून खून केला. या घटनेचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना एका दिवसात यश मिळाले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत, प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.