सांगली : रेल्वे प्रवास दरम्यान झालेल्या अपघाताबद्दल रेल्वे विभागाने प्रवाशाला ९ लाखांची भरपाई देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधीश प्रमोद गो. गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील श्रीमती मनीषा वनकोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याबद्दल भरपाई म्हणून ८ लाख ५० हजार रुपये, त्यावर १६ मे २०२३ पासून ९ टक्के व्याज, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ४० हजार रुपये व अर्जाचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरपाई म्हणून ३० दिवसात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सांगली येथील राजूराम माळी हे दिनांक ३ जून २०२२ रोजी पुणे ते सांगली दरम्यान रेल्वेने सहकुटुंब प्रवास करत होते. सालपा स्टेशन जवळ गाडी आली असता राजूराम यांचा मुलगा आशिष हा जेवणानंतर हात धुण्यासाठी वॉश बेसिन जवळ गेला. त्यावेळी दोन बोगी दरम्यान जोड जवळ त्यांची बोगी जोरजोरात हेलकावे घेत हालत होती. या घटनेमध्ये आशिष रेल्वेच्या बाहेर फेकला गेला. दरवाजा जवळच्या प्रवाशांच्या लक्षात ही घटना येताच कोणीतरी साखळी ओढली व रेल्वे थांबवली. सर्वांनी आशिष याचा शोध घेतला. त्यावेळी आशिष गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आढळून आला. राजूराम यांनी पोलिसांच्या मदतीने आशिष याला लोणंद येथील व त्यानंतर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद झाला. आशिष अल्पवयीन असल्याने त्याच्या वतीने त्यांचे वडिलांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयात ॲड. व्हीं.एम.सावंत यांच्यामार्फत मुंबई येथील रेल्वेचे जनरल मॅनेजर व पुणे येथील डिव्हिजन मॅनेजर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. रेल्वेने प्रवाशाला सदोष सेवा दिल्याचे न्यायालयामध्ये निष्पन्न झाल्याने न्यायालयाने भरपाईचे आदेश दिले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.