सातारा : "लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल होतील. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन असे सहा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर यातील दोन पक्ष लोप पावतील. एक तर ते दोन पक्ष मर्ज होतील किंवा संपुष्टात येतील", असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयनराजेंना तीन वेळा आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून दिलं. मात्र मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला साथ दिली. त्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही 90 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. दोन पक्ष असताना 90 हजार मतांनी पराभव झाला होता. आता तीन पक्ष आहेत त्यामुळे किमान दीड लाख मतांनी त्यांचा पराभव होईल. साताऱ्यातील उमेदवार हे दक्षिण भागातील चांगला चालतो. मात्र यावेळी दोन्हीही उमेदवार उत्तर भागातले आहेत.
बारामतीबद्दल काय म्हणाले चव्हाण?
बारामतीमध्ये संघर्ष आहे. मात्र, शरद पवारांनी बारामतीला देशाच्या नकाशावरती नेलं. त्याबद्दल लोकांमध्ये कृतज्ञतेची भावना आहे. शरद पवारांच्या आदेशानुसार अजित पवारांनी काही काम केले असतील. पण शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते असा प्रश्न लोक आता विचारतात. बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टरवरून गायब करून अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचेच फोटो आहेत, असे निरिक्षणही चव्हाण यांनी नोंदवले.
विशाल पाटलांबद्दल पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, विशाल पाटील यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्यायच किंवा नाही? काय कारवाई करायची? हा आता शिस्तभंग समितीचा अधिकार नाही, तर नाना पटोले आणि प्रभारी यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने बहुमत मिळेल, असे चित्र आहे. 25 ते 26 जागा मिळेल असा अंदाज होता. मात्र आजचा जो रिपोर्ट आहे तो महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे आणखी यश मिळेल असा रिपोर्ट आहे.
विदर्भात दहापैकी नऊ आमच्या जागा येतील
आम्ही नाना पटोले, प्रभारी आणि शरद पवार यांच्याशी एक तास चर्चा केली सर्वांचं म्हणणं आहे की, अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल. उत्तर महाराष्ट्रातही चांगल्या जागा येथील असं शरद पवारांचं म्हणणं आहे. मोदींना आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी घेऊन ते बोलत आहेत. न पटणाऱ्या आणि डोकं चक्रावून जाईल, अशा गोष्टी मोदी करत आहेत. विदर्भात दहापैकी नऊ आमच्या जागा येतील. एक जागा मी भाजपला सोडतोय. गडकरींच्या जागेवरही खूप टफ फाईट होईल, असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.