पंजाब : ती एका सर्वसामान्य पंजाबी घरातील सामान्य मुलगी. पण, तिची स्वप्ने मात्र खूप मोठी होती. कोणत्याही मार्गाने पैसा कमवणे हेच तिचे एकमेव उद्दिष्ट्य होते. त्या मुलीने जेव्हा तारुण्यात पाऊल टाकले तेव्हा पैसा मिळविण्यासाठी तिने एका वकिलाची मदतनीस म्हणून काम करायला सुरवात केली. मग, ती विमा एजंट बनली. लोकांच्या गळ्यात पॉलिसी उतरवू लागली. इतकं काम करूनही पैसा काही मिळत नव्हता. जी अपेक्षा होती तितके यश मिळत नव्हते. मग तिच्या शैतानी डोक्याने एक प्लॅन रचला. तिने काही गुंडांना हाताशी धरले. त्यांना पैशाचे आमिष दाखवले आणि त्यांच्या सहाय्याने तिने बँक लुटून तब्बल साडे आठ कोटी रुपये लुटले. पण, एका शुल्लक चुकीने ती आणि तिचा पती पोलिसांच्या जाळ्यात सापडले. मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग यांच्या अटकेची ही थरारक कहाणी…
मनदीप कौर हिने पैसे मिळविण्यासाठी एक खतरनाक प्लॅन आखला. देशभरातील एटीएम्समध्ये दर रोज रोख रक्कम भरावी लागते. हे काम सीएमएस सिक्युरिटीज कंपनीला देण्यात आले आहे. काळ्या रंगाच्या छोट्या व्हॅन्समध्ये असलेली रोख रक्कम सिक्युरिटीच्या देखरेखीखाली एटीएम्समध्ये रक्कम भरली जाते. मनदीप कौर हिने याच छोट्या व्हॅन्सला आपले लक्ष्य केले. आपला डाव साधण्यापूर्वी मनदीप कौर हिने लुटायचे ऑफिस किती वाजता उघडतं? तिथे किती माणसे असतात, कोण कोण असते याची इत्यंभूत माहिती काढली. नेमकं कोणत्या दिवशी दरोडा घालायचा हे सारे काही तिने पद्धतशीरपणे रचले.
10 जून 2023 हा तो दिवस. लुधियानामधील राजगुरूनगर येथे साडे आठ कोटी रुपयांचा दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीएमएस सिक्युरिटीज कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले होते. त्यांच्या कार्यालयात असलेली रक्कम घेऊन दरोडा घालणाऱ्या टोळीने पोबारा केला होता. पंजाब पोलीस या घटनेमुळे चक्रावले होते. त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी आजूबाजूच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पोलिसांना काही चेहरे ओळखीचे दिसले. त्यांनी अटकसूत्र सुरू केले पण मुख्य म्होरक्या हाती यायचा होता. पोलिसांनी ‘लेट्स कॅच द क्वीन बी’ प्लॅन तयार केला. तिचे नामकरण डाकू हसीना असे केले.पोलीस तपास सुरु असतानाच त्यांना माहिती मिळाली की, डाकू हसीना मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, नेपाळला जाण्याआधी हे जोडपे हरिद्वार, केदारनाथ आणि हेमकुंड साहिब या धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत अशीही माहिती त्यांना मिळाली. उत्तराखंडमधील शिखांचे तीर्थक्षेत्र हेमकुंड साहिब येथे भेट देणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीत दोघांनाही ओळखणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी एक योजना तयार केली. सीसीटीव्हीमुळे पोलिसांना डाकू हसीना मनदीप कौर हिचा चेहरा माहित झाला होताच. त्यामुळे यात्रेकरूंना देण्यासाठी फळे आणि 10 रुपयांची फ्रुटी मोफत देण्याची पोलिसांची ती योजना होती.पोलिसांची तो योजना काम करून गेली. आरोपी दाम्पत्य मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग हे हेमकुंड साहिब येथे तोंड झाकून आले होते. त्यांनी एका विक्रेत्याकडून फ्री फ्रूटी घेतली. फ्रूटी पिण्यासाठी त्यांनी तोंडावरचा कपडा हटविला. तो चेहरा दिसताच पोलीस सतर्क झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली नाही. त्या दाम्पत्याला त्यांनी हेमकुंड साहिबचे दर्शन घेऊ दिले. त्यानंतर काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि मग त्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या.
‘लेट्स कॅच द क्वीन बी’ या ऑपरेशनचे नेतृत्व लुधियानाचे पोलीस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू यांनी केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनदीप कौर हिच्याकडून 12 लाख आणि पती जसविंदर सिंग याचा बरनाला येथील घरातून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.