पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आज उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिजाऊ बंगल्यावर बैठकीसाठी पोहोचले. सकाळी सात वाजता बैठक झाल्याने अमितेश कुमार यांनी बैठकीचा तपशील सांगितला.
अजित पवारांच्या जिजाऊ बंगल्यावर पुणे शहरातील वाहतुकीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिली. या बैठकीसाठी मेट्रोचे अधिकारी देखील उपस्थित होते, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले. बैठक विशेष करून पुण्यातील वाहतूक आणि मेट्रो कामासंदर्भातील होती. अर्धा तास बैठक सुरू होती. या बैठकीला इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कल्याणी नगर अपघात संदर्भात अजित पवारांनी काही विचारलेलं नाही, असंही स्पष्टीकरण पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पोर्शेच्या दुर्घटनेनंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याची पुष्टी केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला अशा अपघातांबाबत फोन येतात. मी पोलिस आयुक्तांना सांगितले की आरोपी मुलगा श्रीमंत कुटुंबातील आहे आणि पोलिसांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. मी त्यांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका असे सांगितले होते.
यापूर्वी, अंजली दमानिया यांनी पोर्शेच्या अपघातानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा दावा केला होता. अपघातातील अल्पवयी आरोपीच्या पालकांना दोष देत पवार म्हणाले की पालकांनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले ज्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला. पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाचे वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. पालकांनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे घडले. मुलगा सुधारगृहात आहे आणि त्याचे वडील आणि आजोबा यांना अटक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.कल्याणीनगर अपघातानंतर काही तासांनी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात आलेले त्यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, टिंगरे यांनी स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. नंतर त्यांनी पुण्यात माझी भेट घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे.दरम्यान, अल्पवयीन मुलाविरुद्ध पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रुग्णालयातील आणखी एका अटक कर्मचाऱ्यालाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख अजय तावरेचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.