मुंबई: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर वाघनखांनी अफझल खानाला मारले. इतिहासातील ही अत्यंत उल्लेखनीय घटना सर्वश्रुत आहे. अफझल खान हा आदिलशहाच्या प्रमुख सरदारांपैकी एक बलशाली सरदार होता.कर्नाटकातील विजापूर अर्थात विजयपूर येथील 'साठ कब्र' या पर्यटन स्थळाशी अफजलखानचा खास संबंध असल्याचं सांगितलं जातं. येथे अफजलखानानं त्याच्या 63 पत्नींची हत्या केल्याचं बोललं जातं. या ठिकाणी विषयी इतिहासात अनेक उल्लेख आहेत.
कर्नाटकातील विजापूर येथे एक चबुतऱ्यावर कबरींच्या सात रांगा दिसतात. त्यात पहिल्या चार रांगांमध्ये 11, पाचव्या रांगेत पाच, सहाव्या आणि सातव्या रांगांमध्ये सात अशा एकूण 63 कबरी आहेत. या कबरींचा आकार, डिझाइन आणि अंतर एकसमान असल्याने त्या अशा व्यक्तींच्या असाव्या, ज्यांचा मृ्त्यू जवळपास एकाच वेळी झाला आहे, असं वाटतं.
कर्नाटकमधील विजापूरचं नाव 2014 मध्ये बदलून विजयपूर असं ठेवण्यात आलं. या शहराच्या एका कोपऱ्यात काहीसं दुर्लक्षित साठ कब्र नावाचं एक पर्यटन स्थळ आहे. हे शहर 1668 पर्यंत आदिलशाही राजवटीची राजधानी होतं. विजापूर संस्थानचा सेनापती अफजल खान याने विजापूर साम्राज्याच्या दक्षिणेकडील विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनखांनी मारलं होतं, असं वृत्त बीबीसी हिंदीनं दिलंय.
1659 मध्ये विजापूरचा तत्कालीन सुलतान अली आदिलशहा द्वितीयने अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी युद्ध करण्यासाठी पाठवले होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या हेन्रि कजिन्स नुसार, या मोहिमेवर जाण्यापूर्वी ज्योतिषांनी या मोहिमेवरून तू जिवंत परतणार नाही, असं अफझल खानाला सांगतिलं होतं. हेन्रि कजिन्स हा 1891 ते 1910 या कालावधीत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या पश्चिम विभागात अधीक्षक होता. कजिन्सने त्याच्या `विजापूर : द ओल्ड कॅपिटल ऑफ द आदिलशाही किंग्ज` या पुस्तकात लिहिलं आहे की, 'अफझलखानाचा भविष्यावर खूप विश्वास होता. त्यामुळे तो ते लक्षात घेत प्रत्येक पाऊल उचलत असे. '1905 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात असं लिहिलं आहे की, परंपरेनुसार अफजलखान स्वतःची कबर आणि मशीद त्याच्या महालाजवळ बांधत होता. ही दुमजली मशीद 1653 मध्ये बांधून पूर्ण झाली.या मशीदीचा सर्वात वरचा मजला महिलांसाठी ठेवण्यात आला होता, असं मानलं जातं. ही तारीख मशिदीच्या कमानीत अफझलखानाच्या नावासह नोंदलेली आहे. जेव्हा अफझलखानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहिमेवर जाण्याचा आदेश दिला गेला, तोवर या मकबऱ्याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं.ज्योतिषांच्या भविष्यवाणीचा अफझलखानावर एवढा पगडा होता की त्याने कबरीच्या शिलेवर विजापूरमधून निघण्याची तारीख त्याच्या मृत्यूची तारीख म्हणून लिहिली. आपण परत येणार नाही, हा विचार अफझल खान आणि त्याच्या सैन्याच्या मनात असल्याने त्याने ही तारीख लिहिली असावी. पुस्तकात लिहिलं आहे की,या कारणामुळे त्याने त्याच्या पत्नींना बुडून मारण्याचा निर्णय घेतला होता.हेन्रि कजिन्सच्या मते, 'या परिसरात 63 महिलांच्या कबरींशिवाय आणखी एक कबर असून ती रिकामी आहे. कदाचित एक किंवा दोन महिला त्याच्या तावडीतून सुटल्या असाव्यात, त्यामुळे या कबरी रिकाम्या राहिल्या असाव्यात.' इतिहासकार लक्ष्मी शरद यांनी 'द हिंदू'साठी लिहिलं आहे की, 'युद्धात मरण पावल्यावर त्या इतर कुणाच्या हाती लागू नये यासाठी अफझल खानने त्याच्या सर्व पत्नींना एक एक करून विहिरीत ढकलून दिलं. त्याच्या एका पत्नीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण नंतर ती पकडली गेली आणि तिला देखील मारुन टाकलं गेलं. 'इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते, 'अफझल खानाच्या या मोहिमेनंतर कित्येक वर्षे अनेक कथा चर्चेत राहिल्या. सरकार लिहितात, त्यापैकी एक कथा अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध युद्धासाठी मोहिमेवर निघण्यापूर्वी एका ज्योतिषाने अफझल खानाला युद्धावरून जिवंत परतणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्याने त्याच्या 63 पत्नींना विजापूर जवळील अफजलपुरा येथे मारून टाकलं, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर या महिला अन्य पुरुषांच्या हाती लागू नयेत.'संशोधक मोहम्मद अनीसुर रहमान खान यांच्या मते, 'कर्नाटकच्या विजापूरमधील अलामिन मेडिकल कॉलेजजवळ एका जुन्या इमारतीनजीक एका चबुतऱ्यावर सात रांगांमध्ये एक सारख्या कबरी आहेत. स्थानिक लोक त्याला `साठ कब्र` असं म्हणतात.' खान यांच्या संशोधनानुसार, 'या सर्व कबरी अफजल खानाच्या पत्नींच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी युद्ध करण्यापूर्वी त्याने या महिलांची हत्या केली होती. अफझल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नींना इतर पुरुषांसोबत विवाह करू नये, यासाठी त्याने हे पाऊल उचलले होते. माझ्या पत्नींच्या शेजारीच मला दफन करावं, अशी त्याची इ्च्छा होती. पण तो युद्धावरून परतला नाही,त्यामुळे ही गोष्ट शक्य झाली नाही.'अनीसूर रहमान खान, मोहम्मद शेख इक्बाल चिश्ती यांच्या हवाल्यानं लिहितात की, 'येथील 60 कबरी लोकप्रिय झाल्या. परंतु हे खरे नाही. कारण येथे एकूण 64 कबरी असून, त्यापैकी एक रिकामी आहे.' अनीसूर रहमान लिहितात की, 'कदाचित हे कब्रस्तान शाही कुटुंबांतील महिलांसाठी आरक्षित असावं. त्याकाळी युद्ध ही सामान्य गोष्ट होती. असं असतानाही एक सेनापती अज्ञानातून असं भ्याड पाऊल कसं उचलू शकतो?'लक्ष्मी शरत या कबरी मागच्या या कहाणीवर विश्वास ठेवतात. कब्रस्तान पाहिल्यावर लक्ष्मी शरत लिहितात, 'काळ्या दगड्यांनी बांधलेल्या कबरी सुस्थितीत आहेत. त्यापैकी काही ठिकाणी दगड फुटलेले आहे. याठिकाणी एक विलक्षण शांतता आहे. मृत्यूच्या खाईत ढकलल्या गेलेल्या स्त्रियांच्या शेवटच्या किंकाळ्यांनी ती गुंजत आहे. मला तिथे थरकाप जाणवत होता. आपल्या पत्नींजवळ आपल्याला दफन केलं जावं, ही अफझल खानाची इच्छा स्वाभाविक होती, पण तो रणांगणातून परतला नाही.'
कजिन्स यांच्या मते, 'अफझलखानच्या राजवाड्याच्या अवशेषांच्या उत्तरेला असलेली त्याची कबर रिकामीच राहिली.' कजिन्स लिहितात, 'अफजल खानाला प्रतापगडावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मारलं त्याच ठिकाणी त्याला दफन केलं गेलं. त्याचा मृतदेह विजापूरमध्ये बांधलेल्या मकबऱ्यापर्यंत आणला गेला नाही.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.