सांगली : ना कोणाचे अर्थसहाय्य, ना कुठला पगार. तरीही तब्बल ६ वर्षे हातात झाडू घेऊन शहराच्या स्वच्छतेचा अखंड उपक्रम सांगलीच्या तरुणांनी राबवून जिल्ह्याच्या सामाजिक कार्याच्या इतिहासात वेगळी नाेंद केली. निर्धार फौंडेशन नावाने संघटना स्थापन करुन सांगलीच्या काही तरुणांनी हाती झाडू, खोरे, पाट्या घेऊन स्वच्छतेचा वसा घेतला. सांगली शहरात १ मे २०१८ त्यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात केली. या अभियानास यंदाच्या महाराष्ट्र दिनी ६ वर्ष म्हणजेच २ हजार १९१ दिवस पूर्ण झाले. नागरिकांच्या मनात स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने कोणत्याही अपेक्षेविना निर्धार फौंडेशनचे सर्व युवक कार्यरत आहेत. रस्ते, चौक, उद्याने, दुभाजक, बस थांबे, स्मशानभूमी, नदीघाट अशा एक अनेक ठिकाणांचा कायापालट करीत शहर अन् गावांना त्यांनी सजविले.
एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी मोहीम राबविली. अभियानास २ हजार दिवस पूर्ण होताच इंडियाज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना प्रमाणपत्र दिले. विश्वविक्रमानंतरही त्यांचे हात थांबले नाहीत. स्वच्छतेचे त्यांचे व्रत सुरुच आहे.
आयुक्तांचाही मोहिमेत सहभाग
महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्थानिक स्वच्छतादूतांसमवेत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवित श्रमदान केले. यावेळी कॉलेज कॉर्नर परिसरातील वाढलेले तण, कचरा हटवून दुभाजकासभोवतीची माती काढली. दुभाजकात नवीन रोपे लावून रंगरंगोटी करण्यात आली. यावेळी सांगली शहर पोलिस निरीक्षक तेजश्री पाटील, भरतकुमार पाटील, वृषभ अकिवाटे, सचिन जगदाळे, गुराण्णा बगले, अनिल अंकलखोपे, सुरज कोळी, अनिरुद्ध कुंभार, सतिश कट्टीमणी, गणेश चलवादे, मनोज नाटेकर, समीक्षा मडीवाळ, भाग्यश्री दिवाळकर, शकील मुल्ला उपस्थित होते.
एकाचवेळी दहा जिल्ह्यात मोहीम
उपक्रमास सहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, रायगड, मुंबई आदी जिल्ह्यातही एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.