लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करताना ‘काँग्रेस सत्तेत आली तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल. काँग्रेस लोकांची संपत्ती लुटून मुस्लिमांना वाटेल’, असे विधान त्यांनी केले होते. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आता यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाष्य करत पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. “मुस्लिमांचं काय घेऊन बसलात?, मलाही ५ मुलं आहेत”, असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मंगळवारी (३० एप्रिल) छत्तीसगडमध्ये निवडणूक रॅली पार पडली. यावेळी आयोजित रॅलीला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी मुस्लिमांवर केलेल्या टिप्पणीबद्दल भाष्य करत भाजपा फक्त अल्पसंख्याक समुदायालाच का लक्ष्य करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
“भाजपाला गरीबांच्या कल्याणासाठी नाही तर गरीबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हताश झाले आहेत. त्यामुळे ते मंगळसूत्र आणि हिंदू-मुस्लिम याबाबत भाष्य करत आहेत. मोदी म्हणतात की, इंडिया आघाडीवाले जनतेची संपत्ती त्यांच्याकडून घेऊन ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना देईल. मग फक्त मुस्लिमांनाच जास्त मुले आहेत का? गरीब लोकांनाही जास्त मुले असतात. मलाही पाच मुले आहेत”, असे प्रत्युत्तर खरगे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले.ते पुढे म्हणाले, “मी एकुलता एक होतो. माझी आई, बहीण आणि काका आता नाहीत. एकदा माझे घर जाळले. ते का जाळले, यामध्ये मी आता जाणार नाही. गरिबांना मुले होतात. मग नरेंद्र मोदी हे फक्त मुस्लिमांबद्दलच का बोलतात? मात्र, दिशाभूल करण्याचे काम करु नका. हा देश घडवायचा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे चालायचे आहे”, असे मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.