यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढाई चांगलीच गाजली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली.
त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. "अजित पवारांनीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार हे त्यांची ती इच्छाही पूर्ण करणार होते, अशी माझी माहिती आहे," असं पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे तुमचे सहकारी तुम्हाला सोडून गेल्याचं बोललं जात आहे. तुमच्यावर असा दबाव नव्हता का? असा प्रश्न जयंत पाटील यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "तो प्रयत्न माझ्याही बाबतीत एकदा झाला. मी पूर्ण एक दिवस तिथं हजेरी लावून आलो. मात्र त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उच्चार करताच आमच्या पक्षातील सगळेच तिकडे गेले."
"राष्ट्रवादी पक्ष दुभंगेल, असा विचारही केला नाही"
राष्ट्रवादीतील फुटीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "आमचा पक्ष दुभंगला जाईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. कारण शरद पवार यांनी एक कुटुंब म्हणून हा पक्ष जपला होता. सगळ्यांच्या उणिवाही सांभाळून घेतल्या होत्या. सगळ्यांना प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त नवीन नेते तयार करावेत, असा प्रयत्न पवारसाहेबांनी केला. मात्र पंतप्रधानांनी घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर आमचा पक्ष फुटला. या फुटीला कोणताही तात्विक मुलामा नाही. पक्ष का फुटला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे," असं पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान, "राष्ट्रवादीपासून वेगळं होऊन अजित पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची प्रगती झाली नाही. असा निर्णय घेतल्यामुळे आपली प्रतिमा खराब होईल, याची त्यांना कल्पना असेल. मात्र तरीही त्यांना तो निर्णय घ्यावा लागला, यातंच सगळं आलं. माझ्यात आणि त्यांच्यात कसलाही सुप्त संघर्ष नव्हता," असा दावाही जयंत पाटलांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.