सोमय्यानीं भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 5 जणं रींगणात! 1 भाजपकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी 2 जणांना उमेदवारी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले एक-दोन नव्हे, तर पाच नेते महायुतीच्या वतीने आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी नारायण राणे हे थेट भाजपमध्येच आले असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आरोप केलेल्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली आहे.
राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपने त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला होता. सोमय्या यांनी राणेंविरुद्ध कारवाईची मागणी लावून धरली होती. ईडी चौकशी सुरू होताच राणे भाजपमध्ये आले आणि आधी राज्यसभेवर आणि आता लोकसभेचे तिकीट मिळविले. अजित पवार यांच्यावर सिंचन गैरव्यवहार आणि जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात सोमय्या यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आरोप केले. कारखाना चालविण्यास घेतलेल्या संस्थेशी बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार संलग्न असून या प्रकरणी ईडीने काही मालमत्ता जप्त केली आहे. आता सुनेत्रा बारामतीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही सोमय्या, फडणवीस व अन्य भाजप नेत्यांनी सिंचन गैरव्यवहारप्रकरणी आरोप केले होते. ते रायगडमधून पुन्हा रिंगणात आहेत.
रवींद्र वायकर यांच्या रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील घरे आणि जोगेश्वरीतील आलिशान हॉटेलच्या बांधकामातील अनियमिततेसंदर्भात सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यांना अटक होणार अशी भविष्यवाणी सोमय्यांनी केली होती. मात्र त्यानंतर वायकर ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात आले आणि चौकशी थंडावली. आता तर त्यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळाली आहे. यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्यावरही सोमय्या यांनी आरोप केले. त्यांची ईडीकडून चौकशी सुरू असून काही मालमत्तांवर टाचही आली आहे. शिंदे गटाने त्यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली आहे.
केलेल्या कामाचा अभिमानच : सोमय्या
याबाबत सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मी भाजपचा छोटा आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. भ्रष्टाचार विरोधात मी जे काही काम केले, त्याचा मला, माझ्या परिवाराला, पक्षाला अभिमान आहे. पक्षाने घेतलेला निर्णय आणि शिस्त मला मान्य आहे. यापेक्षा मी अधिक काही बोलू इच्छित नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.