सांगली : कर्नाटकातील बागलकोट येथील महालिंगपूरम येथे गर्भपात झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रासाठी मृतदेहासह सांगलीत येणाऱ्या नातेवाइकास ताब्यात घेतले. तसेच, सांगलीतील एका डॉक्टरलाही ताब्यात घेतले. याच्यासह जयसिंगपूर, कर्नाटकातील आणखी तीन डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा महालिंगपूरम ठाण्यात वर्ग केला आहे.
महिलेच्या नातेवाईकासह डॉक्टरास पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले झालेले अर्भक चारचाकीत आढळले. पोलिसांनी सांगितले, सांगली पोलिसांनी बसस्थानक परिसरात कारवाई करून गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले. एका चारचाकीमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह घेऊन मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले.
नातेवाईकांसमवेत असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की नाही याची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात केली तेथील डॉक्टर आणि प्रत्यक्ष महालिंगपूरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन डॉक्टरांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्यावरही गुन्हा नोंद केला आहे. आज सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपूरम येथे रवाना झाले आहेत. सोबत मृत महिलेचा नातेवाईक, डॉक्टरासही ताब्यात घेण्यात आले होते.
बनावट डॉक्टर समिती
गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बनावट डॉक्टर समितीचा विषय चर्चेत आला आहे. समितीचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील म्हणाले, ''सांगलीत काही डॉक्टरांचे रॅकेट आहे का, याचा तपास व्हायला हवा. तसेच समितीमध्ये पोलिस, महापालिकेचे अधिकारी असतात. गेल्या काही वर्षांत समितीची बैठक झाली नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गांभीर्याने दखल घ्यायला हवी.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.