सध्या केसांच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. केस असो किंवा त्वचा असो.. दोघांच्याही सौंदर्यासाठी एकवेळ अशी येते की आपण इतर सगळे कॉस्मेटिक्स विसरून जातो आणि आपल्या जुन्या, पारंपरिक उपायांकडे वळतो. कारण त्याचे फायदे आता आपण बऱ्यापैकी जाणून आहोत. आयुर्वेदानुसार भारतात फार जुन्या काळापासून केसांच्या सौंदर्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी भेंडीचा वापर केला जातो . केसांसाठी भेंडी कशा पद्धतीने वापरायची आणि त्याचे नेमके काय फायदे होतात, याची ही थोडक्यात माहिती...
केसांसाठी कसा करायचा भेंडीचा वापर?
आयुर्वेदिक पद्धतीनुसार भेंडी कशा पद्धतीने वापरायची आणि तिचे केसांना कोणकोणते फायदे होतात, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की भारतातच नाही तर अगदी जुन्या काळापासून इजिप्तमध्येही महिला केसांच्या सौंदर्यासाठी भेंडीचा वापर करायच्या.
यासाठी सगळ्यात आधी तर १ ग्लास पाणी पातेल्यात गरम करायला ठेवा. यानंतर भेंडी चिरून घ्या आणि साधारण एक मुठभर भेंडीचे काप त्या पाण्यात टाका. या पाण्याला आता चांगली उकळी येऊ द्या आणि ८ ते १० मिनिटे पाणी उकळून घ्या. यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यात खोबरेल तेल टाकून या पाण्याने केसांच्या मुळांशी अलगद मसाज करा आणि उरलेलं पाणी केसांच्या लांबीवर लावून टाका. यानंतर साधारण २ तासांनी केस धुवून टाका. भेंडी केसांना नैसर्गिकपणे कंडिशनिंग करण्याचं काम करते.
केसांसाठी भेंडीचे उपयोग
१. व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की आपल्याकडे जी काही जुनी पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यानुसार भेंडीमधला चिकट पदार्थ केसांमधील गुंता, कमी करून त्यांना मऊ करण्याचं, केसांवर चमक आणण्याचं काम करतो.२. पुर्वीच्या काळी भेंडीच्या दाण्यांची पावडर करून ती शाम्पूप्रमाणे केस धुण्यासाठी वापरली जायची. यामुळे डोक्यातलं अतिरिक्त तेल शोषून घेतलं जातं आणि त्वचा स्वच्छ होते. यामुळे कोंड्याचा त्रासही कमी होतो.३. भेंडीमध्ये असणारं व्हिटॅमिन सी कोलॅजीन निर्मितीसाठी पोषक ठरते. कोलॅजीन केसांच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.