धक्कादायक! 32 वर्ष्याच्या महिलेचा गर्भपात करतांना मृत्यू :, दाखल्या साठी सांगलीत मृतदेह फिरवला अन...
सांगली : कर्नाटकातील चिक्कोडी भागात गर्भपात करताना एका बत्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नातेवाईक त्या महिलेच्या मृतदेहासह चारचाकीतून सांगलीत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली.
बसस्थानक परिसरात काल सायंकाळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, मृत महिला मिरज तालुक्यातील एका गावाची माहेरवाशिन आहे; तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तिचे सासर आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मृत महिलेचा पती सैन्य दलात आहे. तिला दोन मुली आहेत. ती गरोदर असल्याने घरातील नातेवाइकांनी काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केल्याचे समजते. अहवाल मिळताच त्यांनी तातडीने गर्भपात करण्यासाठी कर्नाटकातील चिक्कोडी येथील महालिंगपूरम गाठले. तेथील एका रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. मृत्यू प्रमाणपत्र नसल्यामुळे अडचण निर्माण होणार होती.दरम्यान, मृत महिलेस चारचाकीत घालून तिचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आज सायंकाळी सांगलीत आले होते. त्यांच्यासमवेत मिरज तालुक्यातीलच एक डॉक्टरही होते. या प्रकाराची माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना समजली. त्यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे गौतम कांबळे, मच्छिंद्र बर्डे आणि सुमित सूर्यवंशी यांना माहिती दिली. पथकातील पोलिसांना बसस्थानक परिसरात एक चारचाकी थांबलेली त्यांच्या निदर्शनास आली.
चारचाकीबाहेर थांबलेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडीची पाहणी केली. त्यामध्ये महिलेच्या मृतदेहासह दोघे बसल्याचे दिसले. चौकशीत त्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला. त्यांनी तातडीने चारचाकी शासकीय रुग्णालयाकडे नेली. रात्री उशिरापर्यत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नव्हता. हा गुन्हा चिक्कोडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.
पोलिसांची सतर्कता
म्हैसाळ स्त्री-भ्रूणहत्याकांडाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याला हादरा बसला होता. पोलिसांच्या सतर्कतेने आता हे नवे प्रकरण उघडकीस आले. सांगलीत कोणत्या डॉक्टरकडे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी आले होते? याची कोणती साखळी आहे का? याचा पोलिस नक्कीच शोध घेतील. मात्र, घटनेनंतर पोलिस दलासही धक्का बसला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.