छत्रपती संभाजीनगर: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होतानाच मोठा अडथळा उभा राहिला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन (EVM) बिघडल्याचा प्रकार समोर आला.
ईव्हीएम मशीन बंद असल्याने सकाळी मतदानाला आलेल्या मतदारांचा हिरमोड झाला. अखेर या 25 ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने मतदार सकाळच्या वेळेत मतदान आटोपण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने सकाळच्याच वेळेत मतदानाची प्रक्रिया काहीशी संथ होताना दिसली.
मतदानाच्या आदल्या रात्री पंकजा मुंडे काळरात्री मंदिरात
बीड लोकसभेच्या मतदानापूर्वी आदल्या रात्री भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी परळीतील काळरात्री मंदिराला भेट दिली. त्यांनी रात्री उशीरा काळरात्री मंदिरात पूजाअर्चा केली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यामुळे बीडमध्ये यंदा पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान असल्याचे चित्र आहे. पंकजा मुंडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आणि वंचितचे अशोक हिंगे यांचे मुख्य आव्हान आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये केरळ पोलिसांच्या तुकड्या तैनात
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकूण 2040 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 41 उमेदवार आहेत. मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी संभाजीनगरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलिसांच्या तुकड्याही अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलवण्यात आल्या आहेत. लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी केरळ पोलीस आणि सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.