नागपूर : १८ वर्षीय तरुणी प्रियकराला भेटायला जाण्यासाठी १४ वर्षीय भाचीला नेहमी सोबत नेत होती. तरुणीच्या प्रियकराने भाचीशी आपल्या मित्राचे सूत जुळवून दिले. दोन्ही युवकांनी मावशी व तिच्या भाचीला एका बंद घरात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, १४ वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे प्रेमप्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात दोन्ही युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदयाल पंचम दांडेकर (२७, रा. वाठोडा) आणि रोहन अशोक बिंजरे (१९, वाठोडा) अशी आरोपींची नावे आहे.
वाठोडा परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणीची रामदयाल दांडेकर याच्याशी दोन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवरून मैत्री झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या वारंवार भेटी व्हायला लागल्या. मात्र, तरुणीला घरातून बाहेर पडण्यासाठी कोणतातरी बहाणा करावा लागत असे. त्यामुळे तिने शक्कल लढवली. तिने १४ वर्षीय भाचीला प्रियकराला भेटायला जाताना सोबत नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मावशीचे प्रेमप्रकरण व्यवस्थित सुरु होते.मात्र, यादरम्यान मावशीचा प्रियकर रामदयाल याने प्रेयसीच्या भाचीलाही प्रियकर शोधून देण्याचे ठरविले. गेल्या महिन्याभरापूर्वी मावशीच्या प्रियकराने आपला मित्र रोहन बिंजरे याला सोबत आणले. त्या दोघांशी एकमेकांशी ओळख करून देऊन त्यांना प्रेमसंबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे मावशी व भाची या दोघेही आपापल्या प्रियकरांना सोबत भेटायला जात होत्या.
अपहरण करून बलात्कार
गेल्या १ मे रोजी मावशी व भाचीला दोनही युवकांनी फिरायला जाण्यासाठी तयार केले. दोघीही दुपारी १२ वाजता घराबाहेर पडल्या. त्या दोघींनाही प्रियकरांनी खरबी येथून दुचाकीने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरात असलेल्या एका बंद घरी नेले. तेथे दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तासाभरानंतर १४ वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडली. मावशीने तिला एका ओळखीच्या डॉक्टरांकडे नेऊन उपचार केला.
अशी आली घटना उघडकीस
मावशीने भाचीला सायंकाळी घरी आणून सोडले. उन्हामुळे तिची प्रकृती बिघडल्याचे तिच्या आईला सांगितले. बहिणीवर विश्वास ठेवून मुलीच्या प्रकृतीची काळजी घेतली. मात्र, प्रकृती आणखी बिघडल्यामुळे तिला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली. मुलीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रकृती बिघडल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने मुलीच्या कानशिलात लावल्यानंतर तिने मावशी आणि तिच्या प्रियकराने केलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.