दादा - ताईमध्ये जुपलीं :, माझ्यात इतके अवगुण होते तर तुम्ही 18 वर्ष गप्प का बसलात? सुप्रिया सुळे
महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली आहेत. ज्या बारामती मतदारसंघात एकेकाळी शरद पवार आणि अजित पवार एकत्रित निवडणूक लढत होते. त्याच मतदारसंघात काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात सामना रंगणार आहे. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत 15 वर्षात काय विकास झाला असा प्रश्न अजित पवार विचारत आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत अजित पवारांवर पलटवार केला आहे.
अजित पवार यांच्या विरोधात कधीही न बोलणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील सभेत मात्र आपले मौन सोडले. सध्या विरोधक कोणी लिहून दिलेले भाषण वाचत आहेत हे माहीत नाही. पण माझ्यात एवढे वाईट गुण होते तर आठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना जाब विचारला आहे.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावाबद्दल कधीच बोलणार नाही, टीका करणार नाही असे म्हटले होते. मात्र, अजित पवार सभांमधून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी वारजे येथे झालेल्या सभेत थेट अजित पवारांना लक्ष्य करत त्यांना जाब विचारला आहे.
अजित पवारांना खोचक टोला
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या भागात विकास झाला. रस्ते असतील, पाणी असेल.
पण काही लोक आज म्हणतात काहीच विकास झाला नाही. पण मी त्यांना माझं मराठीतील पुस्तक पाठवलं. त्यांनी रात्री वेळ काढून ते वाचावं. ते वाचल्यानंतर ते तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतील अशी माझी खात्री आहे. परंतु त्यांना भाषण कोण लिहून देतंय असा प्रश्न मला पडायला लागला आहे, असा खोचक टोला अजित पवारांना लगावला.
आठरा वर्ष गप्प का बसलात?
सुळे पुढे म्हणाल्या, आपण आठरा वर्ष एका संघटनेत काम केलं, घटस्फोट होऊन सहा महिने झाले. पण माझ्यातले असे गुण लोक सांगतात, जे मी कधी ऐकले पण नाहीत. पण माझा त्यांना प्रश्न आहे माझ्यात इतके अवगुण होते तर तुम्ही साडेसतरा वर्ष गप्प का बसलात? आताच तुम्हाला काय झालंय? आता असं काय झालंय की तुम्हाला हे सगळं दिसायला लागलं आहे. त्यामुळे दुर्दैव आहे. आमच्या विरोधकांकडे काही विषय नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.