पुण्यातील बहुचर्चित कल्याणी नगर येथील आलीशान पोर्श कार अपघातप्रकरणी सोमवारी ससून सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. पोलीस या तिघांची चौकशी करत असून यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना बिल्डर बापाने अल्पवयीन मुलाच्या सॅम्पल बदलण्यासाठी सुमारे दोन तासांत १४ वेळा फोन केला. यानंतर डॉ. तावरे यांच्या सांगण्यानुसार रक्ताचे नमुने बदलण्यात आले. रक्ताचे नमुने हे कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आले. यानंतर डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. डॉक्टरांच्या पोलिस कोठडीची मागणी करतांना पोलिसांनी न्यायालयात वरील माहिती दिली.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या तपासानुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने हे डस्टबिनमध्ये फेकून देण्यात आले होते. त्याच्या जागी, दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. तावरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनीर आणि अतुल घाटकांबळे यांच्या घराची मंगळवारी झडती घेतली. त्यांच्याकडून डॉ हलनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये आणि घाटकांबळे यांच्याकडून ५० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.सध्या पोलिस डॉ. तावरे यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास घेत आहे. या प्रकरणात त्याला किती पैसे मिळाले किंवा किती देण्याचे आश्वासन दिले होते याचा तपास केला जात आहे. पोलिस तपासात नमुने बदलण्याची आणि तपासात छेडछाड करण्याची कल्पना डॉ. टावरे यांची होती." मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी पुणे कॅम्प परिसरातील डॉ. टावरे यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यात पोलिसांच्या हाती अनेक महत्वाच्या बाबी लागल्या आहेत.
आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात घेण्यात आले. कॉल डिटेल रेकॉर्डच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, त्याच्या दोन तास आधी, डॉ. तावरे आणि अल्पवयीन मुलाचे वडील यांच्यात तब्बल १४ वेळा संभाषण झाले. व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि सेक्युअर कनेक्शनवरून हे 14 कॉल डॉक्टर आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांमध्ये झाले होते. या कॉल्सचे डिटेल्स पोलिस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
औंध जिल्हा रुग्णालयात देखील पाठवण्यात आले होते रक्ताचे नमुने
औंधच्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी पाठवलेल्या रक्ताच्या नमून्याचा अहवाल हा वेगळा आल्याने ही बाब उघडकीस आली. ससून रुग्णालयातील कर्मचारी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने हे 20 मे रोजी फॉरेन्सिक टीमकडे पाठवले होते. त्यानंतर एका दिवसानंतर, अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली आणि त्याचे नमुने देखील डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले. अल्पवयीन मुलाच्या औंध येथे पाठवण्यात आलेल्या नमुन्यात अल्कोहोल नसल्याचे पुढे आले. परंतु पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघात आणि नमुना गोळा करण्यात २० तासांचा विलंब झाल्याचे कारण सांगितले.ही घटना १९ मे रोजी पहाटे घडली होती. यात अनिश आवडिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. सकाळी ८ वाजता येरवडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सकाळी ११ वाजता त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. दुसरा नमुना सायंकाळी सहाच्या सुमारास घेण्यात आला. ससून रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी राज्य सरकारकडून दोन स्वतंत्र केस दाखल करण्याची मंजुरी मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.