Nestle च्या बेबी फूडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर? अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
नेस्ले इंडियाने गेल्या पाच वर्षांत भारतातील बेबी फूड उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांहून अधिक कमी केल्याचा दावा केला आहे. Nescafe, Cerelac आणि Maggi सारखी उत्पादने नेस्ले इंडिया बनवते. या उत्पादनांमध्ये जास्त साखर असते, कमी विकसित देशांमध्ये जास्त साखर असलेली उत्पादने विकत आहे असा खुलासा पब्लिक आय या वेबसाईटने केला होता. यावर नेस्ले कंपनीने हे स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने समोर आलेल्या या अहवालाची दखल घेतली आहे. माहितीनुसार, FSSAI ची एक समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि चौकशीनंतर अहवाल सादर करेल. या प्रकरणात दोषी आढळल्यास नेस्लेवर कठोर कारवाईही होऊ शकते. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केल्याचे सूत्रांच्या माहितीने वृत्त समोर आले आहे.
स्विस एनजीओ पब्लिक आय आणि इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क (IBFAN) च्या निष्कर्षांनुसार, नेस्लेने युरोपमधील बाजारपेठांपेक्षा कमी विकसित दक्षिण आशियाई देशांमध्ये आणि आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये अधिक साखर असलेली बेबी फूड उत्पादने विकली.
नेस्ले इंडियाचे साखर कमी करण्यावर प्राधान्य
यासंदर्भात विचारले असता कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, नेस्ले इंडियाचे साखर कमी करण्यावर प्राधान्य आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही उत्पादनांनुसार साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. "पोषण, गुणवत्ता, सुरक्षितता आणि चव यांच्याशी तडजोड न करता साखरेची पातळी कमी करण्यासाठी आम्ही नियमितपणे आमच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करत आहोत," असे प्रवक्त्याने सांगितले.
पौष्टिक गुणवत्तेशी कधीही तडजोड नाही
प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह इत्यादी मुलांच्या पोषणविषयक गरजांची खात्री करण्यासाठी त्यांची उत्पादने तयार केली जातात, असा दावा नेस्ले इंडियाने केला आहे. प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमच्या उत्पादनांच्या पौष्टिक गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही. आमच्या उत्पादनांचे पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी आम्ही आमच्या जागतिक अनुसंधान आणि नेटवर्कची मदत घेतो. IBFAN अहवालात वेगवेगळ्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या 150 वेगवेगळ्या बेबी प्रॉडक्ट्सचा अभ्यास करण्यात आला.
15 सेरेलॅक उत्पादनांच्या एका सर्व्हिंगमध्ये सरासरी 2.7 ग्रॅम साखर
अहवालानुसार, नेस्लेचे सहा महिन्यांच्या बाळांसाठी गहू आधारित उत्पादन 'सेरेलॅक' यूके आणि जर्मनीमध्ये साखरेशिवाय विकले जाते, परंतु भारतातून विश्लेषण केलेल्या 15 सेरेलॅक उत्पादनांमध्ये सिंगल सर्व्हिंगमध्ये सरासरी 2.7 ग्रॅम साखर असते. भारतातील पॅकेजिंगवर साखरेचे प्रमाण नमूद करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. उत्पादनात साखरेचे प्रमाण सर्वाधिक सहा ग्रॅम थायलंडमध्ये आढळून आले.
फिलीपिन्समध्ये आठपैकी पाच नमुन्यांमध्ये साखरेचे प्रमाण 7.3 ग्रॅम असल्याचे आढळून आले आणि ही माहिती पॅकेजिंगवरही जाहीर करण्यात आलेली नाही. नेस्ले इंडियाने आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम पोषण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. जे आम्ही 100 वर्षांपासून करत आहोत. आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये पोषण, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.