लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगली लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. सांगलीमध्ये काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहेत. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचार सुद्धा सुरू केला आहे. यामुळे काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलीये. सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी मधला मार्ग नेमका काय काढायचा? यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे. तसेच यासाठी ठाकरे गटाचा प्लान देखील ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल पाटील काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांचा विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करता येईल यासाठी महाविकास आघाडीने पर्याय काढल्याची माहिती मिळाली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भातील पर्याय किंवा पुढे विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील उमेदवार असल्यास त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय नेत्यांकडून घेतला जातोय.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना देखील पाठवण्यात आलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून या संदर्भात अद्याप प्रतिसाद आलेला नाही. काँग्रेस पक्षांकडून या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या प्रस्तावावर विशाल पाटील यांची नाराजी दूर झाली तर महाविकास आघाडी एकत्रित चंद्रहार पाटील यांचा प्रचार करेल अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
सांगलीची जागा शिवसेनाचं लढणार - संजय राऊत
"विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच, त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्या विषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.