काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीबाबतकाँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली असं विधान याठिकाणचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले. सांगलीतून महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहे.
आज सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार असून तत्पूर्वी विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशाल पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आपण अर्ज भरला पाहिजे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली. भाजपाला हरवायचं असेल तर इथं सक्षम उमेदवार द्यायला हवा होता असं म्हणत कार्यकर्त्यांनी आपण अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी असं म्हटलं. ३८ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीत अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील सर्व महान नेत्यांच्या समाधीचे आणि ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेऊन अर्ज भरला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आज आमची रॅली आहे. कार्यकर्त्याचे मनोगत ऐकून घेत आज सभा घेणार आहे. काल २ अर्ज भरले आहेत. आज २ अर्ज भरले जातील. एकंदरित परिस्थिती पाहता या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडीने लक्षात घेत १९ तारखेच्या ३ वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचा AB फॉर्म नक्कीच देतील. निर्णय आम्ही घेतला नाही असं म्हणणाऱ्यांनी चर्चा संपली आहे असं म्हणणं योग्य नाही. आम्ही आजही आशा धरून आहे. कोणता निर्णय घ्यायचा हे सभेतून सांगू. राजकारणात ३ दिवसांत खूप बदल होतात. पुढे पाहू असं म्हणत विशाल पाटील यांनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली.
आघाडीचा धर्म पाळा, वरिष्ठांच्या सूचना
सांगलीच्या जागेवरील तिढा पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना वरिष्ठांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. विश्वजित कदम म्हणाले की, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला तात्काळ चर्चेसाठी नागपुरात बोलावलं, त्याकरता मी आलो. रमेश चेन्निथला यांच्यासोबतही फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका आम्ही मांडली. विशाल पाटलांच्या अर्जासोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. मात्र, शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले. एक काँग्रेस पक्ष आणि एक अपक्ष असं त्यांनी सांगितले.तसेच राज्याच्या आणि देशाच्या ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहे. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण जी सांगलीची परिस्थिती सध्या उद्भवली आहे त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी करीता अत्यंत चांगलं वातावरण आहे. यासाठी काय निर्णय घ्यायचे ते ज्येष्ठांनी ठरवावं असंही विश्वजित कदम यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.