बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत होणार आहे. या लढतीत संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या बाजूने उभे ठाकले आहे. या माध्यमातून आता कुटुंबियांकडूनच अजित पवारांवर हल्ला चढवला जात आहे. त्यात आता बारामतीत शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल, असा दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सुनंदा पवार या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात दाखल झाल्या होत्या. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी वरील विधान केले. '' बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेदवाराकडे मताधिक्य आहे. आमचा उमेदवार पुढे आहे यात कसलीही शंका नाही. आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोकं फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल,'' असा दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात नणंद भावजय आमने सामने आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबात संघर्ष वाढलाय.दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीत स्वत: शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, शरद पवारांचे नातू रोहित पवार, अजित पवार याचे पुतणे युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, अजित पवारांचे थोरले भाऊ श्रीनिवास पवार हे सर्वजण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर अजित पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.