बामणोलीतील सुगंधित तंबाखू पॅकेजिंगचा कारखाना उध्वस्त, पाच परप्रांतियांना अटक २० लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबी, कुपवाड पोलिसांची संयुक्त कारवाई
सांगली : मिरज तालुक्यातील कुपवाडजवळील बामणोली येथे बेकायदा सुरू असलेला सुगंधी तंबाखू, सुपारी पॅकेजिंगचा कारखाना उध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून पाच परप्रांतियांना अटक करण्यात आली आहे. एलसीबी आणि कुपवाड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
योगेंदर रामब्रिज सिंह (वय ३०), द्रुक गंगा सिंह (वय २४), मोनू रामबहादूर सिंह (वय ३०), हरिओम पुन्ना सिंह (वय ४५), देव बमर सिंह (वय २२, सर्व मूळ रा. सिकंदरा, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक खास पथक तयार केले होते. पथक अवैध व्यवसायांची माहिती घेत असताना पथकातील दीपक गायकवाड, कपील साळुंखे यांना बामणोली येथे गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू आणि सुपारी पॅकेजिंग होत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने बामणोली येथील दत्तनगर येथे छापा टाकला. तेथे एका पत्र्याच्या शेडमध्ये पॅकेजिंगचे काम सुरू असल्याचे दिसून आले. पथकाने तेथील दोन अल्पवयीन मुलांसह सातजणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी संशयितांनी हा कारखाना अहिल्यागर येथील शहानवाज पठाण याच्या मालकीचा असल्याची कबुली दिली. त्यानंतर पाचजणांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कुपवाडचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, पंकज पवार, सिकंदर वर्धन, अन्न व सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी, नमुना सहायक तानाजी कवळे, दीपक गायकवाड, कपील साळुंखे, इम्रान मुल्ला, अमर नरळे, जितेंद्र जाधव, महादेव नागणे, संदीप पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.