Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट का? काँग्रेसची पिछेहट का झाली? वाचा

सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट का? काँग्रेसची पिछेहट का झाली? वाचा 


महाविकास आघाडीचं अंतिम जागा वाटप मंगळवारी जाहीर झालं. यामध्ये बहुचर्चित राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ अखेर शिवसेनेकडंच गेला. या ठिकाणी काँग्रेसनं जोर लावूनही त्याचा काही उपयोग झाला पण हा सांगलीचा तिढा नेमका काय आहे? काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तो का महत्वाचा होता? जाणून घेऊयात. 

सांगलीची जागा आपल्याच पारड्यात पडावी यासाठी स्थानिक आमदार विश्वजीत कदम यांनी खूप प्रयत्न केले. यासाठी ते स्वतः दिल्लीत हायकमांडला जाऊन भेटले राज्यातील पक्षश्रेष्ठींसोबत त्यांनी यासाठी बराच जोर लावला. दरम्यान, आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकमत होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर करुन टाकली. त्यामुळं काँग्रेसवर दबाव वाढला होता.


काँग्रेसचा इच्छुक उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांची त्यामुळं गोची झाली. कारण गेल्या पाच वर्षांपासून विशाल पाटील यांनी याठिकाणी काम करायला सुरुवात केली होती. पण आता ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली. पण सांगलीतल्या जागेसाठी अनेक शह-काटशह झाले आहेत. वेगळ्या प्रकारचं राजकारणही खेळलं गेलं आहे. यापार्श्वभूमीवर सांगलीतील या ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे,

"सांगली हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे. २०१४ भाजप विजयी झाली त्यानंतर २०१९ ला काँग्रेसनं स्वत: हून जागा सोडून दिली. हा या मतदारसंघाचा इतिहास असल्यानं शिवसेनेनं यावर काँग्रेसचा हक्क नाही असा दावा करत, एकमत होत नसतानाही आपला उमेदवारही तिथं जाहीर करुन टाकला. पण सांगली हा शिवसनेचा बेस नाही, फक्त रिप्लेसमेंटच्या जागेसाठीच शिवसेनेनं इथं हट्ट धरला. तडजोड करण्यात पण काँग्रेस इथं हारलीच नाहीतर वसंतदादा पाटलांच्या घराला डावल्यामुळं काँग्रेसची इथं पिछेहाटही होणार आहे"

चंद्रहार पाटलांची राजकीय कारकीर्द काय?

शिवसेनेचे सांगलीचे उमेदवार असलेले चंद्रहार पाटील यांची राजकीय कारकीर्द मर्यादीत आहे. एकाच वेळी ते फक्त जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळं त्यांचा राजकारणी म्हणूनही या ठिकाणी कमी कस लागणार आहे. 

काँग्रेसची रणनीती चुकली

महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना जर तोडीस तोड टक्कर द्यायची असेल तर महाविकास आघाडीकडं विशाल पाटील हे एकमेव उमेदवार होते. पण त्यांना उमेदवारी मिळू न शकल्यानं महाविकास आघडीची रणनीती चुकली आहे. शरद पवारांनी जागा वाटप करताना मेरिट हा निकष लावला असला तरी सांगलीत हा नियम पाळला गेला नाही, तिथं केवळ जागेची वाटणीच केली गेली. विश्वजीत कदमांमुळं सांगलीत काँग्रेस आहे. पण त्यांचाच शब्द पक्षश्रेष्ठींनी ऐकून घेतला नाही, याचाच अर्थ काँग्रेसमध्ये काही ताळमेळ नाही. यामुळं सांगली जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शिवसेनेसाठी निवडणूक कठीण

सांगलीतील जागा जिंकणं हे शिवसेनेसाठी कठीण असल्याचं सांगितलं जातं आहे. कारण जरी त्यांना वाटतं असलं की, राष्ट्रवादी काँग्रेसची मत ट्रान्सफर झाल्यानं आपल्या उमेदवाराला मदत होईल. पण ते ही पुरेसं ठरणार नाही. कारण या मतदारसंघात जितके बुथ आहेत तेवढी शिवसेनेची इथं माणसंही नाहीत.

कोल्हापूरची जागा शिवसेनेला का सोडावी लागली

कोल्हापूरची जागा शिवसेनेची असली तरी ती त्यांना काँग्रेससाठी सोडावी लागली. कारण शिवसेनेत मोठी फूट झाल्यानं कोल्हापुरात पक्षाची ताकद कमी झाली आहे. तर दुसरीकडं जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार काँग्रेसचे असल्यानं तिथं काँग्रेसचा उमेदवार दिल्यास जागा राखता येईल असं गणित मांडलं गेलं. यासाठी शरद पवारांचे जवळचे असलेल्या शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. पण शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढण्यास स्पष्ट नकार दिला, तर काँग्रेसच्या तिकीटावर लढायला आवडेल असंही म्हटलं. यामुळं नाईलाजानं शिवसेनेला कोल्हापुरची जागा काँग्रेसला सोडावी लागली.

जयंत पाटलांची भूमिका काय?

दरम्यान, सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीच हा डावपेच खेळल्याचीही चर्चा सुरु आहे. ठाकरेंना सांगून जयंत पाटलांनी ही खेळी केली आहे. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ठाकरे पूर्णपणे जयंत पाटलांवरच अबलंबून आहेत. कारण सांगलीत जयंत पाटील हे वजनदार नेते आहेत. सांगली, मिरज, कवटेमहांकाळ या भागावर त्यांची चांगली ताकद आहे. त्यातच भाजपचे उमेदवार संजय पाटील हे जयंत पाटलांचे जवळचे असल्यानं ते त्यांच्या विजयासाठी देखील मदत करु शकतात, असंही बोललं जात आहे.

विशाल पाटलांनी बंड केलं तर काय होईल?

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांनी जर बंड केलं तर सांगलीची निवडणूक चुरशीची होईल. यामध्ये संजय पाटलांवर नाराज असलेले भाजपमधील लोक विशाल पाटलांना मदत करु शकतात. कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इथल्या भाजपच्या तीन आमदारांनी संजय पाटलांना विरोध केला होता. संजय पाटील हे दोन वेळा मोदींच्या लाटेवर निवडून आले होते. यंदाही त्यांच्या नशिबी मोदींचा करिश्मा येऊ शकतो.
साभार दैनिक सकाळ 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.